'इंडी' आघाडीच्या बैठकीची तारीख ठरेना! राऊतांनी दिली कारणं

    06-Dec-2023
Total Views |

Raut


मुंबई :
बुधवारी होणारी 'इंडी' आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ही बैठक पुढे ढकलण्याची कारणं सांगितली आहे. काही व्यक्तींच्या व्यक्तीगत समस्यांमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आपल्या निवासस्थानी ६ डिसेंबर रोजी इंडी आघाडीची बैठक आयोजित केली होती. परंतू, अचानक ही बैठक पुढे ढकलण्यात आली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "काही नेते उपलब्ध नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या घरात लग्न असल्याने त्या बैठकीला येऊ शकत नव्हत्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आजारी आहेत आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवही उपलब्ध नाहीत. तसेच एम. के. स्टॅलिन यांच्या राज्यात महापुर आला आहे. त्यामुळे ते येऊ शकत नाही."
 
"इंडी आघाडीमध्ये अजिबात कोणतीही फुट, तुट नाही. जर मतभेद असतील तर आम्ही चर्चेतून सोडवू. पण २०२४ ची लोकसभेची निवडणूक आम्ही एकसंघपणे लढवू यावर आमचं एकमत आहे. शरद पवारदेखील बैठकीला येणार होते. परंतू, काही व्यक्तींच्या व्यक्तीगत समस्यांमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे," असे राऊतांनी म्हटले आहे.