पुराणकथांतील तात्पर्याचा शोध

    06-Dec-2023   
Total Views |
Article on Moral of Purankatha

स्वामींनी त्याकाळच्या लोकांना माहीत असलेल्या पुराणकथांचा आधार घ्यायचे ठरवले असावे. आजच्या बुद्धिवादी काळात विज्ञाननिष्ठेला महत्त्व आल्याने त्या पुराणकथा-लोकांना भाकडकथा वाटतात. परंतु, ३५० वर्षांपूर्वी लोक या पुराणकथांतील तात्पर्यार्थ पाहत असत. तो श्रद्धायुक्त लोकांचा काळ होता. लोक पुराणकथांतील तार्किकतेपेक्षा त्यातील तात्पर्य भक्तिभावाने पाहत असत. त्यामुळे त्या पुराणकथा आहे तशाच स्वीकारीत. त्यांची चिकित्सा करीत नसत.

समर्थ रामदासांनी भोळ्या भक्तीपेक्षा ज्ञानभक्तीचा, प्रत्ययकारी अनुभवाचा प्रसार केला. तरीही श्लोक ११६ पासून पुराणातील कथांचे संदर्भ पाहायला मिळतात, याची दोन कारणे सांगता येतील. स्वामी, ‘देव भक्ताची उपेक्षा करीत नाही’ असे म्हणाले तेव्हा एखाद्या शिष्याने ‘यासाठी शालाधार व पुराणातील काही संदर्भ आहेत काय? असल्यास ते सांगा,’ असे विचारले असावे. म्हणून स्वामींनी वाद-संवाद-भक्तिपंथ या विषयांवरील विवेचन पुढे चालू न ठेवता, पुराणातील दाखले सांगायला सुरुवात केली असावी, अशी शक्यता आहे. याबाबतीत दुसरा एक अंदाज असा करता येतो की, सर्वसामान्य लोकांना तत्त्वज्ञानाची फक्त सुत्रे सांगत गेले,

तर ती त्यांना आत्मसात करता येत नाहीत. त्यासाठी काही कथा सांगितल्या, तर त्यातील तात्पर्यार्थ लोकांच्या लक्षात राहतो. कथा आठवली की तात्पर्य आठवते. आता कथाच सांगायच्या तर त्या काल्पनिक कथा रचून सांगण्यात काही अर्थ नसतो. अशा काल्पनिक कथा लोक करमणूक म्हणून ऐकतात आणि विसरून जातात, म्हणून स्वामींनी त्याकाळच्या लोकांना माहीत असलेल्या पुराणकथांचा आधार घ्यायचे ठरवले असावे. आजच्या बुद्धिवादी काळात विज्ञाननिष्ठेला महत्त्व आल्याने त्या पुराणकथा-लोकांना भाकडकथा वाटतात. परंतु, ३५० वर्षांपूर्वी लोक या पुराणकथांतील तात्पर्यार्थ पाहत असत. तो श्रद्धायुक्त लोकांचा काळ होता. लोक पुराणकथांतील तार्किकतेपेक्षा त्यातील तात्पर्य भक्तिभावाने पाहत असत. त्यामुळे त्या पुराणकथा आहे तशाच स्वीकारीत. त्यांची चिकित्सा करीत नसत.

स्वामींनी या श्लोकात पुराणकथांपैकी दोन कथांचा उल्लेख करून त्यातील तत्त्वसिद्धान्त लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन लोकांना त्या कथा माहीत होत्या. तो श्लोक असा आहे-

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी।
दिल्हा क्षीरसिंधू तथा ऊपमानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥ ११६
या श्लोकातील पहिली कथा अंबरीष राजाची आहे. हा राजा सात्विक असून भगवान विष्णूंचा महान भक्त होता. राजा असूनही तो ऋषितुल्य जीवन आचरत असल्याने ’अंबऋषी’ असा त्याचा उल्लेख स्वामींनी केला आहे. वैष्णवात एकादशी व्रताला महत्त्व आहे. अंबरीष राजा विष्णुभक्त असल्याने एकादशी व्रताचे निष्ठेने पालन करीत असे. एकादशीचा उपवास आणि दुसर्‍या दिवशी द्वादशीला उपास सोडून व्रताचे पारणे फेडण्याची प्रथा आहे. त्यामुळे वैष्णवांच्या दृष्टीने द्वादशी तिथीलाही महत्त्व असते.

एकदा राजा अंबरीष कार्तिकी एकादशीचे व्रत करीत असताना द्वादशीच्या दिवशी प्रात:काळी अचानकपणे दुर्वास ऋषी राजाला भेटायला आले. राजाने रीतिप्रमाणे दुर्वास ऋषींचा आदर-सत्कार केला व त्यांना विनंती केली की, “मुनिवर, आज माझ्या एकादशी व्रताचे पारणे फेडायचे आहेे. तेव्हा आपण माझ्याकडे भोजन ग्रहण करावे.” राजाचे आमंत्रण स्वीकारून दुर्वास ऋषी स्नानासाठी नदीवर गेले. दुर्वास ऋषी महान तपस्वी परंतु शीघ्रकोपी, तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध आहेत, हे राजाला माहीत होते. नदीकाठी स्नान केल्यावर त्या रमणीय परिसरात दुर्वास ऋषी संध्या, जप करायला बसले. संध्या-जप-ध्यान यात ते बराच काळ रममाण झाले. इकडे अंबरीष राजा दुर्वास ऋषींची वाट पाहत होते. अतिथी भोजन झाल्याशिवाय राजाला एकादशीचा उपवास सोडता येत नव्हता. एकादशी व्रताचा उपवास द्वादशी तिथीला सोडायचा असतो. द्वादशी तिथी संपत आली होती आणि ऋषींचा पत्ता नव्हता.

राजा पेचात पडला. त्यातून मार्ग काढण्यासाठी राजाने तीर्थाचे आचमन केले व व्रताची सांगता केली. तितक्यात दुर्वास ऋषी तेथे आले. राजाना आचमन घेताना पाहून अतिथीचा अपमान झाला, असा विचार करून त्यांचा राग अनावर झाला. ऋषींनी आपल्या जटेतील एक केस उपटून त्याचे कृत्य हे शस्त्र केले आणि राजाच्या अंगावर सोडले. राजा अंबरीष विष्णूचा परमभक्त असल्याने भगवंतानी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सोडून ती कृत्या जाळून भस्म केली. नंतर सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. दुर्वासांनी शरण जाऊन विष्णूची प्रार्थना केली, तेव्हा ते थांबले. दुर्वासांनी अंबरीष राजाला शाप दिला होता. त्यासाठी भगवंताला अवतार घेणे भाग पडले. भक्ताला वाचविण्यासाठी भगवंतांनी गर्भवासातील कष्ट नऊ महिने भोगून जन्म घेतला व आपला भक्त अंबरीष राजा याला शापातून मुक्त केले. देव आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही. देव भक्तासाठी कष्ट सहन करतो. पण, त्याला सोडून देत नाही. त्याला भक्ताचा अभिमान असतो.

यातील दुसरी कथा ऋषिपुत्र उपमन्यू याची आहे. उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. त्या काळचे ऋषीमुनी तपश्चर्या करून नि:स्वार्थपणे शिष्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत. या निरपेक्ष वृत्तीमुळे व्याघ्रपाद ऋषींच्या घरी अत्यंत गरिबी होती. दारिद्य्रात ते आपले जीवन कंठीत होते. सर्वकुटुंब त्यांना साथ देत होते. घरी गाई पाळण्याची ऐपत नसल्याने त्यांच्या मुलांना साधे दूधही मिळत नसे. उपमन्यूची आई तिच्या मुलांना पाण्यात पीठ कालवून ते प्यायला देत असे. उपमन्यू एकदा मित्राबरोबर शेजारच्या ऋषींच्या आश्रमात खेळण्यासाठी गेला. तेथे त्याला गाईचे धारोष्ण मधुर दूध प्यायला मिळाले. घरी आल्यावर आईने त्याला रोजच्याप्रमाणे पीठ कालवलेले पाणी दिले. परंतु, तो ते घेईना. शेजारच्या आश्रमात जसे गाईचे दूध मिळाले, तसे हवे म्हणून तो हटून बसला. काही केल्या ऐकेना. दरिद्री आईच्या डोळ्यात पाणी आले. ती मुलाला म्हणाली, “बाळा, मागच्या जन्मी आपण ईश्वराची भक्ती केली नाही, त्याला विसरलो. त्यामुळे आपल्याला या जन्मी दारिद्य्र प्राप्त झाले. गरिबी आपल्या नशिबी आली. गाय पाळण्याची आपली ऐपत नाही. आपण गरीब आहोत.

आम्ही तुम्हाला गाईचे दूध देऊ शकत नाही.” ते ऐकून उपमन्यू म्हणाला, “आई, तू म्हणतेस ते खरे असेल, तर मी आतापासूनच ईश्वरांची भक्ती करतो व त्याला प्रसन्न करून येतो.” उपमन्यूने मनापासून भगवान शंकरांची उपासना केली. शंकर प्रसन्न झाले. त्यांनी उपमन्यूला नुसते गुडघाभर दूध काय, दुधाचा समुद्रच देऊन टाकला, असे ही कथा सांगते. त्यावर अथांग दुधाने भरलेला सागर असतो का? असली तार्किक शंका विचारू नये. या कथेतील मथितार्थ एवढाच की, परमेश्वराची मनापासून भक्ती केली, तर तो भक्ताला हवे त्यापेक्षा कैक पटीने देतो. कारण, देवाला आपल्या भक्ताचा अभिमान असतो. देव भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही, हा विचार आता समर्थ या पुढील श्लोकांतूनही सांगणार आहेत. भगवतांनी उपमन्यूला क्षीरसागर सहजपणे देऊन टाकला, यासाठी समर्थ ‘दिल्हा’ या मराठमोळ्या क्रियावाचक शब्दाचा प्रयोग करतात. हा शब्द किती जुना आहे, हे भाषाशास्त्राचे अभ्यासक जाणतात. शेवटी ‘नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी’ हे या कथांतील सार आहे आणि ते सत्य आहे, असे सांगून समर्थ लोकांना देवाच्या उपासनेला प्रवृत्त करतात.

७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..