शोषित-वंचित समाजाला खर्या अर्थाने मानवी हक्क आणि मूलभूत मानवी मूल्यांचा अधिकार मिळवून देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांचे ऋण समाज, देश कधीच फेडू शकणार नाही. महामानवाच्या विचारकार्याचा इथे सारांश संदर्भ मांडला आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बालपणापासून दुःख, वेदना आणि अत्याचार सहन केले. परंतु, आपल्या ध्येयापासून तसूभरही ते मागे गेले नाहीत. त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी उपाशी राहिले. पावाचा तुकडा खाऊन लायब्ररीमध्ये अभ्यास करीत बसले. त्यांची शिक्षणाची भूक ही प्रचंड होती आणि त्यांनी जाणलं होतं की, शिक्षणाशिवाय आपला उत्कर्ष नाही. त्यांनी आपल्या जीवनातील तीन गुरूंनी दिलेली शिक्षणाविषयीची शिकवण आत्मसात केली होती.
भगवान गौतम बुद्ध हे त्यांचे पहिले गुरू ,दुसरे गुरू महात्मा जोतिबा फुले, तिसरे गुरू संत कबीर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तीनही गुरूंच्या शिक्षणाच्या महत्त्वपूर्णमार्गदर्शनाप्रमाणे शिक्षण घेतले. त्यांनी स्वतः शिक्षण घेतले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना शिक्षणाचे महत्त्व सांगून शिक्षण घेण्यास सांगितले. आज जगातील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत की, त्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता सामाजिक क्रांती केली. त्यांनी समाजाला बौद्ध धम्माची दिक्षा दिलीच, हे करीत आसताना आपल्या अनुयायांना सांगितले की, “तुम्हाला पटला तरच बौद्ध धम्म स्वीकारा, मी सांगतो आहे म्हणून नको.” असो.
प्रचंड नकारात्मक वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे टिकून राहिले, ठाम एकटे लढा देत उभे राहिले, त्यामागे जे आहे ते त्यांचे प्रचंड वाचन. त्यांचा प्रत्येक विषयामधील अभ्यास, १८-१८ तास नुसते वाचन करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कॉलनीमध्ये त्या काळामध्ये केवळ आपले ग्रंथ ठेवण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी राजगृहासारखा बंगला बांधला. केवळ पुस्तकाच्या आवडीसाठी स्वतंत्र बंगला बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव विद्वान आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे म्हणत की, “जर तुम्हाला असंख्य पुस्तकांचे ग्रंथालय व्यवस्थित ठेवलेले पाहायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाला भेट द्या.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही छोट्या मोठ्या कारणाने निराश झाले नाहीत.
अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या देशाला अभिप्रेत असलेल्या संविधानाची निर्मिती त्यांनी केली. आज जगातले सर्व विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभ्यास करायला येत असतात, यातच डॉ. बाबासाहेब यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे यश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वान महापुरुषाने प्रथमच या देशातील सर्वांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी, अधिकार, आपल्या संविधानातून दिला. डॉ. बाबासाहेब हेच आपले ऊर्जास्रोत आहेत. आपल्याला एकच नाव हृदयावर कोरून ठेवायचे आहे, ते नाव आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते असते. ते नाव म्हणजे... आपलेप्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर....
डॉ. संजय खैरे
(लेखक डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्स येथे साहाय्यक प्राध्यापक आहेत.)