केंद्रात स्थिर आणि गतिमान सरकार असेल, तर त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच होत असतो. आजघडीला जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या असताना, भारतात मात्र सातत्याने तेजी दिसून येते. गतिमान अर्थव्यवस्थेचे पडसाद शेअर बाजारात दिसून येतात. मुंबई शेअर बाजार ‘बीएसई’ आणि राष्ट्रीय शेअर निर्देशांक ‘निफ्टी’ने घेतलेली उसळी लक्षवेधी ठरत आहे. गुंतवणूकदार आणि भांडवलदारांमध्ये उत्साह दुणावला असून देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेला त्यातूनच हातभार लागतो. अन्य देशांत आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असताना, तेथील शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच दिसते. दुसरीकडे बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘बीएसई’चे बाजार भांडवलदेखील चार ट्रिलियन डॉलर्सच्या पल्ला गाठला. ‘बीएसई’च्या सूचीबद्ध कंपनीचे बाजारमूल्य गेल्या दहा वर्षांत १७.५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढले आहे. ‘बीएसई’ पाठोपाठ राष्ट्रीय शेअर निर्देशांक ‘निफ्टी’च्या सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलानेही चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा नुकताच ओलांडला आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अर्थव्यवस्थेतील सकारात्मक भावनेने भांडवली बाजाराला गती मिळाली आहे. बाजार भांडवलाच्या आधारावर भारत पहिल्या पाच देशांपैकी एक असल्याचे ‘एनएसई’ने स्पष्ट केले आहे. ‘एनएसई’वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल देशाच्या ‘जीडीपी’ (सकल घरेलु उत्पादन)च्या १.१८ म्हणजेच ११८ टक्के आहे. वास्तविक ही वाढ अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठांपेक्षा कमी असली, तरी येत्या काळासाठी ती मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. चालू आर्थिक वर्षात ‘एनएसई’वर ‘शेअर्स ट्रेडिंग व्हॉल्यू’ अर्थात समभाग व्यवहाराचे प्रमाण ४७ टक्के होते. हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि ब्राझील यांसारख्या जागतिक बाजारपेठांपेक्षा कमी आहे. ‘इक्विटी’ विभागाची दैनंदिन सरासरी उलाढाल सहापटीने वाढली आहे. तसेच समभागाच्या मुल्यांची दैनंदिन सरासरी उलाढाल गेल्या दहा वर्षांत पाच पटीने वाढली आहे. या सर्व घडामोडींमुळेच भारतीय शेअर बाजारांनी चार ट्रिलियनला गवसणी घातली आहे, असे म्हणता येईल.
‘अमृतकाळ’ ते अर्थसत्ता
‘जागतिक महासत्ता’, ‘अर्थसत्ता’ ही बिरुदावली आपलीच आहे, अशा दिमाखात वावरणार्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या विळख्यापासून लागलेली घरघर अद्याप सुरूच आहे. त्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली झेप दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी पोहोचली आहे. आगामी काळात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसह तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल सुरू आहे. तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. त्यात भाजप मित्रपक्षांची सत्ता येऊन नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास गुंतवणूकदार आणि भांडवलदारांमध्ये आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. उद्योग-व्यवसाय भरभराटीस येत आहेत. त्यातूनच भारत केवळ तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून समाधान मानेल, असे दिसत नाही. पहिला क्रमांक गाठणे हा फार मोठा पल्ला असला तरी अशक्यप्राय नक्कीच नाही. दहा वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकापुढे गटांगळ्या खात होती. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यापासून गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्थेने मागे वळून न पाहता, पाचवा क्रमांक गाठला. येत्या काळात तिसरा क्रमांक निश्चित मानला जात आहे. त्यास देश-विदेशातील वित्तीय संस्थांचा हातभार लागणार आहे. विदेशी वित्तीय संस्थांनी विविध कारणांमुळे भारतीय बाजारापासून काहीसे अंतर ठेवले होते. ते पुन्हा भारतीय परतण्याच्या स्थितीत आहेत. हे सुचिन्ह असून, देशात राजकीय स्थिरता आणि विकासात्मक नेतृत्व असेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. भारतीय राजकारणातील विकासात्मक स्थिरता अर्थव्यवस्थेला योग्य दिशा आणि गती देत आहे. त्यामुळेच देशी आणि विदेशी वित्तीय संस्थांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांचा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अमृतकाळ’ ठरेल, असे सुतोवाच करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत अर्थव्यवस्थेचीही वाटचाल अमृतकाळाकडे सुरू आहे. अमृतकाळाकडून अर्थसत्तेचा प्रवास कठीण असला तरी अशक्यप्राय नक्कीच नाही!