डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा उद्योजक

    05-Dec-2023   
Total Views |
Article on Sunil Bhikaji Shinde

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आयुष्यात यश मिळवणारे यशस्वी उद्योजक आणि ‘डिक्की’चे मुंबई अध्यक्ष सुनील भिकाजी शिंदे. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...

१५ कोटींची उलाढाल असलेल्या ‘तन्वी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन’चे सर्वेसर्वा म्हणजे सुनील शिंदे. मोठमोठ्या व्यावसायिक वास्तूंच्या इलेक्ट्रिकल कामांचे कंत्राट ही कंपनी घेते. सुनीलयांच्या कंपनीमध्ये २० अभियंते आणि ७५ पेक्षा जास्त कुशल कामगार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला सत्ताधारी व्हायचा मंत्र सांगितला. तो मंत्र आर्थिकतेच्या आयामात सिद्ध करत सुनील आज ‘डिक्की’चे (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री) मुंबई अध्यक्ष आहेत. विविध प्रशासकीय व्यावसायिक उलाढालींमध्ये समाजात उद्योजककसे तयार करता येतील, यासाठी ते कार्यरत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिले. याबद्दल नितांत श्रद्धा आणि अभिमान असलेल्या सुनीलयांना ‘एमपीएसी’, ‘युपीएससी’ शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या गरीब-होतकरू मुलांसाठी आधुनिक आणि परिपूर्ण वाचनालय नवी मुंबई परिसरात निर्माण करायचे आहे. त्यांनी असा संकल्प केला आहे की, अनुसूचित जातीजमातीतून पाच यशस्वी उद्योजकनिर्माण करायचे. अर्थात, पाच उद्योजकउभे केल्यानंतर अधिकाअधिक व्यक्तींना उद्योजक बनवून त्यांच्या आयुष्यात आर्थिक सामाजिक स्थैर्य आणि सुरक्षितता आणावी, हे त्यांचे ध्येय. वैयक्तिक पातळीवर सुनील यांचे लक्ष्य आहे की, वर्षात त्यांची कंपनी १०० कोटींची उलाढाल करेल. मोठी आर्थिक सामाजिक स्वप्न पाहणारे सुनील शिंदे यांच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर कळते की, ‘कोशिश करने वालो की हार नही होती.’

घणसोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संस्थेचे ते उपसचिवही आहेत. आज सुनील यशस्वी उद्योजक असले, तरीसुद्धा काही वर्षांपूर्वी ते एका खासगी कंपनीमध्ये काम करायचे. दशकभर त्यांनी त्या कंपनीत काम केले. मात्र, काही कारणास्तव त्यांना ही कंपनी सोडावी लागली. नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला खरा, पण पुढे काय? हा विचार क्षणभर त्यांच्या मनात आलाच. कारण, घरी पत्नी आणि नुकतच जन्माला आलेलं बाळही होतं. त्यांच्या आईने अनुसूयाबाईने त्यांच्या मनातील विचार ओळखला. त्या म्हणाल्या, ”आपण काय कुणाच्या जीवावर मुंबईला आलो नाय, आपल्या जीवावर आपण जगतोय.” तो दिवस आणि आजचा दिवस सुनील यांनी उद्योजक क्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. दहा हजार रुपयांवर काम करणारे सुनील आज यशस्वी उद्योजक म्हणून गणले जातात.

धाराशीव- कळंबचे भिकाजी शिंदे आणि अनुसूया शिंदे या दाम्पत्याला चार मुले त्यापैकी एक सुनील. कामानिमित्त हे दोघे मुंबई पवई येथील महात्मा फुले नगरात स्थायिक झाले. वस्तीतले सगळेच हातावरची पोट असलेलेलोक. ८०चे दशक होते. भिकाजी आणि अनुसूया देाघेही मोलमजुरी करत. त्यात दोन वेळेचे अन्नही मिळणे मुश्किल. घरात थेाडा हातभार लागावा म्हणून सुनीलही उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीमध्ये छोटीमोठी काम, मोलमजुरी करत. ते राहायचे पवई ‘आयआयटी’ जवळ आणि शाळा भांडुपला. एक तास अनवाणी चालत ते शाळेत जात. पण, शाळेचा कधीही खाडा केला नाही. कारण, आई सांगे, ”आबा तू शिकला पाहिजेस. आपल्या बाबासाहेबांनी सांगितलय म्हणून तुला शिकावच लागेल.” तसे सुनील जात्याच हुशार होते. त्यामुळे शाळेच्या पाटील बाई, नामजोशी बाई यांचे ते लाडके विद्यार्थी. १९८७ साली अनधिकृत वस्ती म्हणून सुनील यांचेही घर तोडण्यात आले आणि त्यांना दुसर्‍या वस्तीत राहावे लागले.

घराचे सामान गोळा करताना त्यांच्या पायात खिळा रुतला. त्यामुळे ते चार-पाच दिवस शाळेत गेले नाहीत. सहाव्या दिवशी शाळेत गेल्यावर नामजोशी बाईंनी त्यांना बोलावले. सुनील यांना वाटले की, बाई मारतील. पण, बाईंनी विचारपूस केली म्हणाल्या, ”खिळा लागला तर इंजेक्शन घे. वार्षिक परीक्षा जवळ आली आहे. त्यामुळे खाडा करू नको.” तर अशा मातृतुल्य शिक्षिकांमुळे सुनील यांना शाळेची अभ्यासाची आवड निर्माण झाली. त्यावेळी सुनील यांच्या घरी रेडिओ होता. रेडिओवर बातम्या, भाषणे ऐकताना त्यांना वाटायचे की, माझेही नाव असेच रेडिओवर यावे. त्यासाठी तरी मी शिकून मोठे व्हायला हवे. पुढे सुनील यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. या दरम्यान प्रवीण मांजरेकर यांच्याशी मैत्री झाली. शिक्षणाबरोबरच सुनील नोकरी करू लागले. पुढे दहा वर्षे त्यांनी नोकरी केली. याचदरम्यान त्यांचा विवाह झाला. वंदना नावाची खर्‍या अर्थाने सहचारिणी त्यांना लाभली.

व्यावसायिक म्हणून पहिल्यांदाच कंत्राट घेतले. त्यावेळी सुनील यांची फसवणूक झाली. नफा तर नाहीच, पण लाखोंचा तोटा झाला. अशावेळी नवीनच लग्न होऊन आलेल्या वंदना यांनी स्वत:चे मंगळसूत्र, दागिने गहाण ठेवून सुनील यांना साथ दिली. असो. पारदर्शक व्यवहार आणि सचोटीचे विनम्र वागणे यामुळे सुनील यांचा व्यवसायात जम बसला. मयुरेश कुलकर्णी यांनी त्यांना व्यवसायात सोबत केली. सुनील म्हणतात, ”महामानव क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकार्य माझ्या आयुष्याची प्रेरणा आहे. कष्ट, जिद्द आणि समाजशीलतेसोबत व्यवहाराची पारदर्शकता हीच यशाची गुरूकिल्ली आहे.” सुनील शिंदे यांचे विचार आणि कर्तृत्व हे म्हणूनच सर्व समाजासाठी प्रेरणादायी असेच!

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.