डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानविषयक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विचारांचे चिंतन आणि मनन आवर्जून केले जाते. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सैनिकीकरणासंबंधी विचार क्वचितच केंद्रस्थानी आलेले दिसतात. तेव्हा, आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या झुंजार नेतृत्वाने सैन्यासंबंधी मांडलेली भूमिका विशद करणारा हा लेख...
आपल्याला जन्म कोठे मिळावा, हे मानवाच्या हातात असते, तर कदाचित सारा इतिहासच बदलून गेला असता. इतिहासाच्या घडणावळीत मनुष्यमात्राच्या शक्ती, बुद्धी आणि कर्तृत्वाचा सिंहाचा वाटा असतो. जो वीर पुरुष प्रतिकुल परिस्थितीत हालअपेष्टा, प्रसंगी हेटाळणी सहन करत प्रवाहपतीत न होता, प्रवाहाला वळण देतो, तो खरा झुंजार योद्धा. प्राक्तनाची जननी नियती.या जननीने बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म जाणीवपूर्वक महू या लष्करी छावणीत घडवून आणला असावा. तो जणू संकेत होता - ‘मुला, तुला आयुष्यभर लढायचे आहे.’ सैनिकी बाणा हा त्यांचा वारसा पितृ व मातृ घराण्याची देणगी होती. सुभेदार रामाजी संकपाळ एक शिस्तबद्ध योद्धा, हे पिताश्री. कबीरपंथी. त्याच संस्कारातून बाबासाहेबांची आयुष्याकडे पाहण्याची वृत्ती ही बोधीसत्व बनून गेली.
दलितोद्वाराचे कार्य अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ थोरांनी केले. पण, ते सवर्ण होते. बाबासाहेब स्वत: मात्र या समाजरचनेचे जन्मामुळे ‘बळी’ ठरले होते. ‘He was victim of society.’परंतु, समाजाप्रति असूया, दुराग्रह न धरता भारताची अखंड सेवा प्रामाणिकपणे करत या मातीतल्या बोधिसत्त्वाची त्यांनी कास धरली. त्यांनी परकीय तत्वांची प्रलोभनेही झुगारली. १९३५ साली येवले येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणाले होते, “मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही,” हा एक पूर्वापार अन्यायाचा चित्कार होता. तेव्हा त्याकाळी अनेक थोर नेत्यांनी त्यांचे मतपरिवर्तन करायचे प्रयत्नही केले. पण, त्या सर्वांचा मान राखत आंबेडकरांनी प्रज्ञा, करुणा, श्रद्धा मानणारा बुद्ध धर्मच या मातीतला धर्म स्वीकारून हिंदुस्थानावर मेहेरनजर केली. म्हणूनच मला भारतरत्न बाबासाहेब हे सच्चे जहाल देशभक्त भावतात.
त्यांच्या आयुष्याचा आणखी एक पैलू म्हणजे, झुंजार वृत्ती व सैन्यावरचे त्याचे अतीव प्रेम. ते स्वत: काही काळ बडोदे संस्थानच्या लष्करात सेनाधिकारी होते. ‘लेफ्टनंट’ या पदापर्यंत पोहोचल्यावर आपल्या समाजाच्या उद्धाराकरिता सयाजीराव महाराजांना विनंती करून ते सैन्यातून निवृत्त झाले, हा इतिहास आहे. लढाऊ, शिस्तबद्ध आयुष्याचा पाया जो महूच्या लष्करी शिक्षण छावणीत बालपणी सुरू झाला, त्याला परिपक्वता मिळाली ती ‘गायकवाड लष्करात.’ कोलंबिया, लंडन विद्यापीठामधून उच्च पदव्या मिळवून बाबासाहेब ‘बॅरिस्टर’ झाले. पण, त्यांनी वकीलपत्र स्वीकारले ते दलितोद्धाराचे. यामध्ये त्यांना आर्थिक, नैतिक पाठबळ मिळाले ते दोन उदार संस्थानिकांच्यामुळे. आयुष्यभर ते विनम्रतेने कबूल करत - “बडोद्याचे महाराज, कोल्हापूरचे छत्रपती व माझे हजारो लढवय्ये दलित बांधव यांच्या केवळ स्मरणाने माझ्या अंगात हत्तीचे बळ संचारते.” या दोन संस्थानिकांनी बाबासाहेबांचे ठायी असणारी लढाऊ, झुंजार वृत्ती हेरली होती. अभ्यासू वृत्ती व लढाऊ बाणा यामुळे प्रत्येक संकटाला त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. मुख्यत: ते स्वत: ग्रंथवेडे व शौर्याचे उपासक होते. ते नेहमी म्हणत, “शुद्र हे मूळचे क्षत्रीय होत. अपघात व अन्यायाने आमची घसरण झाली. याचे एक कारण अज्ञान.” ते दूर व्हावे म्हणून त्यांनी सिद्धार्थ, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, छ. संभाजीनगरची स्थापना केली.
आपल्या समाजाच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले. पहिले महायुद्ध संपताच डबघाईमुळे ब्रिटिशांनी ‘महार रेजिमेंट’ बरखास्त केली. दलितांचे एक उत्पन्नाचे दालन बंद होऊन दलित समाजात बेकारी बोकाळली. या महार जवानांनी ‘जी. आर. बॉम्बे नेटीव्ह इन्फन्ट्री व कॅव्हलरी’ पायदळ/घोडदळामध्ये ब्रिटिशराज शर्थीने लढून इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. त्यामुळे बाबासाहेब क्रुद्ध झाले. त्यांनी व्हाईसरॉय लिनलिगोथ यांच्याशी पत्रव्यवहार केला, चर्चा केली. ‘महार रेजिमेंट’ पुन्हा सुरू व्हावी, म्हणून लंडन गाठून राणी व्हिक्टोरीयास साकडे घातले. त्यावेळी महायुद्धाचे ढग क्षितिजावर गडगडू लागले. इंग्लंडला सैनिकांची निकड भासू लागली. बाबासाहेबांच्या प्रयत्नाला यश आले. ब्रिटिशांनी बाबासाहेबांना प्रश्न केला, “महार म्हणून हिणवले, तर आपण नाराज होता. मग रेजिमेंटचे नाव ‘महार’ ठेवण्यावर तुमचा जोर का?” तेेव्हा व्हाईसरॉय लिनलिगोथला जे उत्तर बाबासाहेबांनी दिले, ते फार महत्त्वाचे. ते म्हणाले, “आम्ही मायनाक भंडार्याची औलाद आहोत. शूद्र हे मूळचे क्षत्रीय आहेत. शिवकालीन-पेशवाईत आमच्या शिलेदारांनी पराक्रम गाजवला आहे. तुम्हाला १८१८ साली विजय मिळवून दिला तो ‘जी. आर. नेटीव्ह बॉम्बे महार रेजिमेंट’ने, हे विसरू नका.” ‘महार रेजिमेंट’ हेच नाव ठेवण्यात आले. आजसुद्धा ही ‘महार रेजिमेंट’ हिंदुस्थानी सैन्याचा गौरव आहे.
‘महार रेजिमेंट’चे पुनरुज्जीवन झाले, तेव्हा बाबासाहेबांनी सर्व तरुणांना लष्करात भरती होेण्याचे आवाहन करताच, त्यांच्यावर संभावित नेत्याने टीका केली. पण, बाबासाहेब अजिबात डगमगले नाहीत. या बाबासाहेबांच्या विचारामागे एक उद्देश होता. तो म्हणजे, हिंदुस्थान स्वतंत्र झाला की शिस्तबद्ध सैन्याची खडी लाजीम तयार असावी. सावरकरांचाही हाच विचार होता. वीर सावरकरांना ‘रंगरूटवीर’ संबोधण्यात आले. हे लिहिण्याचे प्रयोजन हेच की, दोन प्रखर राष्ट्रभक्त देशाचाच विचार करतात, करत राहतात.
त्याकाळी ब्रिटिश सैन्यात (Royal Indian Army) मुस्लिमांची भरताड प्रचंड होती. ते प्रमाण स्वातंत्र्योत्तर काळात तसेच राहिले असते, तर कदाचित परिस्थिती भयानक झाली असती. बाबसाहेबांना वाटत होते की, हिंदुस्थानी सैन्यात सर्वसमावेशकता येऊन दलितांना रोजगार मिळावा. सुभाषबाबूंनी ‘आझाद हिंद सेना’ युद्धबंद्यांमधून बनवायचे ठरवून प्रयत्न सुरू करताच, वीर सावरकर व बाबसाहेबांनी सर्व बंदी भारतीयांना ‘आझाद हिंद सेने’ला (Indian National Army) मदत करण्याचा आदेश दिला. नंतर इंग्रजांनी ब्राह्मण, जाठ, रामोशी, भिल्ल जातींना उपद्रवी म्हणून सैन्यात मज्जाव केला. तसेच सैन्यात जाणार्या हिंदुस्थानी वीरांची स्थिती ‘न घरका न घाटका’ होत असे. कारण, एतद्देशीय त्यांना ‘देशद्रोही’ म्हणून हिणवत, तर गोरा साहेब ‘काला आदमी’ म्हणून डिवचत. भविष्यात स्वातंत्र्यानंतर शिस्तबद्ध सैन्याची जरूरी आहे, हे ओळखून बाबासाहेब व वीर सावरकरांनी ‘लेखण्या तोडा, बंदूका घ्या,’ असे आवाहन करताच ते ‘रंगरूटवीर’ ठरले.
१९४६च्या सुमारास मुंबईत ब्रिटिश भारतीय नौसेनेत (Indian National Army) बंडाळी होताच तिला नैतिक पाठिंबा दिला तो बाबासाहेब, तात्याराव व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष अबुल कलाम आझाद यांना समर्थन देऊ नये म्हणून अडवण्यात आले. नाविकांच्या या बंडाला ‘हिंदू महासभा’, ‘फॉरवर्ड ब्लॉक’, ‘बहिष्कृत समाज’ यांनी मात्र समर्थनार्थ प्रभात फेर्या काढल्या, हा इतिहास आहे. बाबासाहेबांनी सैन्यात स्थानिक हिंदूंनी भरती होण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे तत्कालीन मुस्लीम समाजानेही साथ दिली. कराचीमधील नाविकांनी बंडात सहभागी होऊन भविष्यातील उठावाची चुणूक दाखवल्यामुळे, तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांना ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ व ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये हिंदुस्थानी स्वातंत्र्याची घोषणा करावी लागली.
देशाची फाळणी अटळ झाली, तेव्हा बाबासाहेबांनी सत्तांतर होणार असेल, तर लोकसंख्येची अदलाबदल करा, अशी मागणी करताच तथाकथित मानवतावाद्यांनी मतांवर डोळा ठेवून आक्रोश, आकांडतांडव केला. (If at all there is transfer of power, there has to be transfer of population.) या आव्हानाला सर्वथैव पाठिंबा दिला तो वीर तात्याराव सावरकरांनी. त्यामुळे दोन प्रखर राष्ट्रवादी नेत्यांच्या राष्ट्राबद्दलच्या भूमिकेत साम्य असते, भले त्यांची तत्वभिन्नता असो, हेच खरे. सैन्याच्या विकास व व्याप्तीबद्दल बाबासाहेब आग्रही होते. सैन्यकपात, सैन्यखर्चात आखडता हात योग्य नव्हे. सरकारने फाफटपसारा कमी करून सैन्यवृद्धीचा ध्यास घ्यावा, असे यानिमित्ताने आवर्जून सूचवावेसे वाटते!
विनायक अभ्यंकर
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)
९७६६०४९०७१