अमिताभ ते रजनकांत... राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गज कलाकारांना पोहोचले निमंत्रण
30-Dec-2023
Total Views | 79
1
मुंबई : देशभरातील तमाम रामभक्त सध्या २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दिवशी अयोधअयेत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखदारपणे रंगणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी श्रीरामनगरी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या संदर्भातील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजेरी लावणार असून यात अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जवळपास ८ हजार लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले असून यात चित्रपटसृष्टीतील बऱ्याच मंडळींचा देखील समावेश आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठीची निमंत्रण पत्रिका महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार, अनुपम खेर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यापर्यंत पोहोचली आहे. याशिवाय रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.
हिंदीचित्रपटसृष्टीतील कलाकारांपाठोपाठ दाक्षिणात्य कलाकार देखील या सोहळ्याला हजर राहणार असे दिसून येत आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता प्रभास, चिरंजिवी, ऋषभ शेट्टी आणि मोहनलाल यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हजारो रामभक्त उपस्थित राहणार यात शंकाच नाही.