जालना : शनिवारपासून जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे सुरु झाली आहे. जालनाकरांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी काढले. अयोध्या रेल्वे स्थानकावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित झाले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जालनामधून वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त रेल्वेप्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या १६० किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी ही ट्रेन दोन वर्षात २५० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची एक लाख सहा हजार कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. यावर्षी १३ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे."
जालना-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे ते मुंबई असा जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभानंतर याच रेल्वेतून देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांनी प्रयाण केले.