ठाणे : सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर शब्दांना जपले पाहिजे. माणूस जोडण्याची भाषा सर्वत्र ऐकू आली पाहिजे. समाजाला जोडण्याची ताकद कवी - लेखकांमध्ये असते. त्यांनी योग्य भूमिका घेतली तर ते विश्व् जोडू शकतात. असा आशावाद अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केला.
शारदा प्रकाशन आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात नुकत्याच पार पडलेल्या प्रकाशन सोहोळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा.अरुणा शोभणे, लेखिका प्रज्ञा पंडित,लेखिका माधुरी वैद्य,लेखिका उषा राव, चित्रकार सतीश खोत, मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील, लेखक संदेश लाळगे, सहलेखिका स्वाती राणे, प्रकाशक डॉ.संतोष राणे ,मनीष पंडित आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.शोभणे म्हणाले की," मोबाईलमुळे माणूस जवळ आला असे वाटत असले तरी मनाने तो दूर गेलेला आहे. त्याला सांस्कृतिकदृष्ट्या जोडायचे असेल तर सर्व भाषेतील लेखकांना महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. नव्या पिढीला वाचनाच्या, पुस्तकांच्या, साहित्याच्या जवळ न्यावे लागेल. साक्षर समाजापेक्षा सुसंस्कृत समाजच उद्याचा नवा भारत अधिक प्रगतीशील करतील. शाळा - महाविद्यालयांमध्ये पुस्तकाची प्रदर्शने भरवली पाहिजेत. जसे जमेल तसे कवी - लेखकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते डॉ. उषा राव, डॉ. प्रकाश जंगले, मानसी सूर्यवंशी, पोलीस कवी नारायण गाडेकर आणि कवयित्री मनिषा गोडबोले यांना शाल, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
'या' १५ पुस्तकांचे प्रकाशन
माधुरी वैद्य यांच्या नर्मदा परिक्रमा, मनमित, डायनाच्या बांगड्या , गीताचे लग्न, हादसा, युरेका, कवयित्री प्रा. प्रज्ञा पंडीत यांच्या बहावा, कथानक, १५० वेज टू थिंक पॉझीटिव्ह, कॉन्फीडन्ट पब्लीक स्पीकिंग, १५० टिप्स टू ओव्हरकम एनझाइटी अँड फियर, हाऊ टू वीन इंटरव्हूज आणि प्रख्यात चित्रकार सतीश खोत यांच्या "अर्करेषा", मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील यांच्या "मी कुणबी बोलतोय" तसेच प्रा. संदेश लाळगे यांच्या "स्व-यशाची गुरुकिल्ली" या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.