२३ जागांची वल्गना करणाऱ्या 'उबाठा' गटाकडे २३ माणसे तरी आहेत का?, नितेश राणेंचा खोचक टोला

    29-Dec-2023
Total Views |
BJP Leader Nitesh Rane on UBT

मुंबई :
लोकसभेला इंडिया आघाडीतर्फे २३ जागा लढविण्याची वल्गना करणाऱ्या 'उबाठा' गटाकडे २३ माणसे तरी आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दि. २९ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, सामनाचे माजी संपादकही आजकाल संजय राऊत आणि उबाठा गटाची लायकी काढायला लागले आहेत. भाजपसोबत यांची युती असताना स्वतः अमित शहा, देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर यायचे, चर्चा करायचे. तेव्हा उद्धव मध्येच उठून जायचे आणि आदित्य-वरुणला चर्चेला बसवायचे. कधीकधी श्रीधर पाटणकरही असायचा. आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल. मग खर्गे तरी यांना वेळ देतील का, हा प्रश्न आहे. कोणीही गल्लीतील नेते यांना टपल्या मारत आहेत. ही यांची लायकी. त्यामुळे उगाच २३ ची वल्गना करण्यापेक्षा ज्या ५ जागा मिळतील, त्या घ्या आणि शांत बसा, असा सल्ला राणे यांनी दिला.

संजय राऊतचे संरक्षण काढा

२२ जानेवारीला भव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम भाजपचा आहे, असे धर्मांतरीत, लव्ह जिहाद झालेला मुल्ला संजय राऊत म्हणत आहे. मुस्लीम लीग, हिंदूद्वेषी काँग्रेस आणि शरद पवारांची भूमिका पुढे रेटण्याचे काम राऊत करीत आहे. २२ तारखेचा कार्यक्रम अयोध्येतील मंदिर समितीने, असंख्य साधुसंतांनी एकत्र बसून निश्चित केला आहे. त्याला भाजपचा कार्यक्रम म्हणून राऊतने आपल्या मालकाची हिंदू द्वेषी भूमिका दाखवून दिली आहे. संजय राऊतने जर वारंवार हिंदू समाजाचा अपमान केला, तर मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की, याचे संरक्षण काढून घ्या आणि हिंदूंच्या स्वाधीन करा. तो परत दोन पायांवर घरी जाणार नाही, याची काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्त्ववादी विचारांचे कार्यकर्ते घेतील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.