अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे राष्ट्रार्पण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ११ हजार कोटींहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

    29-Dec-2023
Total Views |
Ayodhya Maharshi Valmiki Airport

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी सुमारे 11:15 वाजता पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.

यावेळी इतर अनेक रेल्वे प्रकल्पही ते देशाला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे 12:15 वाजता पंतप्रधान नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे ते 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.
 
यामध्ये अयोध्या आणि आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प यांचा समावेश आहे. अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, संपर्क व्यवस्था सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास तसेच वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ होत आहे.
 
असे आहे नवे विमानतळ

अयोध्‍येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित केला आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल. दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी ते सुसज्ज असेल. टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागामध्‍ये अयोध्येतील उद्घाटन होऊ घातलेल्या श्रीराम मंदिराच्या स्थापत्यकलेचे चित्रण केले आहे. टर्मिनल इमारतीचा अंतर्गत भाग भगवान श्रीराम यांचे जीवन दर्शवणारी स्थानिक कला, चित्रे आणि भित्तीचित्रांनी सुशोभित केला आहे. अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत उष्णतारोधक छत प्रणाली, एलईडी दिवे, पावसाचे पाणी साठवणे, कारंज्यांसह हिरवळ, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प यासारख्या विविध शाश्वत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

रेल्वे स्थानकाचेही नूतनीकरण

अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित करण्यात आला आहे. तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानकाची इमारत उद्वाहक, सरकते जिने, खाद्य पदार्थ, भोजन, उपाहारगृह परिसर, पूजा साहित्याची दुकाने, कपडे ठेवण्यासाठीच्या खोल्या, बालसंगोपनासाठी कक्ष , प्रतीक्षालय यासारख्या सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. स्थानकाची इमारत 'सर्वांसाठी खुली' आणि 'आय. जी. बी. सी. प्रमाणित हरित स्थानक इमारत' असेल.