मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता अडचणीत आल्या आहेत. 'कोचादाइयां' या तमिळ चित्रपटाशी संबंधित फसवणूक प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या असून या प्रकरणात लता यांना बंगळुरू न्यायालयाने जामीन दिला असून अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने लता रजनीकांत यांना १ लाख रुपये आणि २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, लता यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'सेलिब्रिटी असल्याची ही किंमत मोजावी लागत आहे', असे मत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
लता रजनीकांत म्हणाल्या की, “माझ्यासाठी हे एका लोकप्रिय व्यक्तीचा अपमान, छळ आणि शोषणाचे प्रकरण आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे मला ही किंमत मोजावी लागत आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे प्रकरण मोठे नसले तरी बातमी खूप मोठी होते. ही कोणतीही फसवणूक नाही. आमची प्रतिमा डागाळण्याचे हे फक्त एक षडयंत्र होते. ज्यातून माझी सुटका झाली आहे.”
पुढे त्या असं म्हणाल्या की, “ज्या पैशांबद्दल बोलले जात आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे मीडिया वन आणि संबंधित लोकांमधील प्रकरण आहे. त्यांनी आधीच तडजोड केली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण त्यांच्यातील आहे. हमीदार म्हणून मी खात्री केली की त्यांना पैसे दिले गेले आहेत. यानंतर या प्रकरणामध्ये मला गुंतवण्यात आले”, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.