'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’चा थक्क करणारा प्रवास येणार मोठ्या पडद्यावर!

    26-Dec-2023
Total Views |

morya 
 
मुंबई : लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे जीवन कसे असते? त्यांना जीवनाक कोणत्या हाल-अपेष्टा सोसाव्या लागतात या सगळ्याची सत्य परिस्थितीत मांडणारा मोऱ्या चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
इतकेच नव्हे, तर मोऱ्या या मराठी चित्रपटाचा टीझर ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' प्रदर्शित करण्यात आला होता. याशिवाय 'एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत ‘मोऱ्या’ने ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला आहे.
 
मोऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते जितेंद्र बर्डे म्हणतात, “कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आमच्या पहिली निर्मिती असलेल्या 'मोऱ्या' या चित्रपटाने जाणकार रसिक समीक्षकांचे लक्ष वेधले होते. युके मधील प्रीमियर शो पाहून बराच वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी, अभिनय व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. 'मोऱ्या' हे पात्र मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रिया तेथील अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखविली”.
 

morya 
 
'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित 'मोऱ्या'मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा 'मोऱ्या' उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा? हे प्रेक्षकांना १२ जानेवारी २०२४ रोजी पाहता येणार आहे.