पुणे : पत्रकारांच्या घरांचा विषय एक मोहिम म्हणून हाती घ्यावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. मराठी पत्रकार संघाच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत ही गोष्ट खरी आहे. पत्रकारांची स्वत:ची हक्काची घरं आढळून येत नाही. मागच्या काळात मुख्यमंत्री असताना मी यासाठी प्रयत्न केले होते. पण एक मोहिम म्हणून पत्रकारांच्या घरांचा विषय हाती घ्यावा लागेल."
"लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे बघितले जाते. आता माध्यमांची संख्या आणि प्रकार दोन्ही वाढले आहेत. यासोबतच माध्यमांमधील पत्रकारांचीही संख्या वाढत आहे. सर्वसामान्य घरातील तरुण आणि तरुणी या व्यवसायात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनाही स्थैर्य येणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे," असेही ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, "मीडिया मुक्त आणि न्याय्य राहण्याकरिता त्यातल्या शेवटच्या घटकांचा विचार करायला हवा. मुख्यमंत्री म्हणून माझा माध्यमांशी जवळचा संबंध आला. पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भातील कायदा, पेन्शनचा विषय मार्गी लावणे यासारखे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत घरे घ्यायची असल्यास पत्रकारांसाठी काही व्याज अनुदानाची सवलत देता येईल का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अशा प्रकारची योजना आणण्याचे काम करु, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आवश्यकता असल्यास उपमुख्यमंत्री कार्यालयात एक अधिकारीही नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.