नाव ‘सीताराम’ तरी...

    25-Dec-2023   
Total Views |
cpm-leader-sitaram-yechury-will-not-attend-ram-mandir-inauguration
 
अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचा मंदिरातील भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दि. २२ जानेवारी रोजी आयोजित भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण मान्यवरांना पाठविण्यास सुरुवात झालीदेखील झाली. अगदी प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हणणार्‍या, सोनिया गांधींनाही निमंत्रित करण्यात आले. त्याचबरोबर आतापर्यंत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही आमंत्रित केले आहे. असेच निमंत्रण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते सीताराम येचुरी यांनादेखील पाठविण्यात आले. मात्र, त्यांनी आधीच या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला येचुरींचा नकार मनातून आला की, मग काही नाईलाजास्तव, याचे उत्तर येचुरीच देऊ शकतात. कोट्यवधी रामभक्त हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी आतूर आहेत; मात्र सुरक्षा आणि नियोजनामुळे फक्त निमंत्रितांनाच या सोहळ्याला उपस्थित राहता येणार आहे. ‘इंडिया’ आघाडीचे भिजते घोंगडे ‘जैसे थे’ असून, अद्याप ना नेता निवडता आला ना उद्देश निश्चित करता आला. अशा ’इंडिया’ आघाडीसोबत असलेली निष्ठा दाखविण्यासाठी, येचुरी अनुपस्थित राहत आहेत की, मग आपली उरलीसुरली व्होट बँक नाराज होईल, याची भीती त्यांना वाटते? डावी विचारसरणी नेहमीच भारतविरोधी कृत्यांना समर्थन करत असल्याचे अनेकदा दिसून आले. एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेला, सीपीएम आता काँग्रेससोबत ’इंडिया’ आघाडीत सहभागी झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना सत्तेतून खाली खेचत, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. तीच तृणमूल काँग्रेस आता ’इंडिया’ आघाडीत सहभागी आहे. मुळातच राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहणे, हे डाव्यांच्या धोरणाला साजेसेच म्हणा. त्यामुळे येचुरींचा नकार हा स्वाभाविक होता. मात्र, विरोधी नेत्यांना निमंत्रित केले नसते, तर त्यांनी मोठा आकांडतांडव केला असता, हेही तितकेच खरे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळूनही, त्याला नकार देणार्‍या आणि नावात ‘सीताराम’ असणार्‍या येचुरींना प्रभू श्रीराम सद्बुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
 
द्रमुकचा हिंदी अन् हिंदू राग

द्रमुकच्या खासदारांची बेताल वक्तव्यांची मालिका अद्याप कायम आहे. परवाच द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतीयांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. ”उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या लोकांनी फक्त हिंदी भाषा शिकली आहे, ते नंतर तामिळनाडूमध्ये येऊन, तामिळ भाषा शिकतात व इथेच घर बांधून रस्ते आणि शौचालये साफ करतात,‘’ असे मारन बरळले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला असून, तो खरं तर मागील काही महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. ”गूगलचे सीईओ सुंदर पिचाई मूळचे तामिळनाडूचे असून, त्यांनी जर हिंदी भाषा शिकली असती, तर ते आज एखाद्या ठिकाणी मजदूर म्हणून काम करत असते,” असेही अकलेचे तारे तोडत, त्यांनी तामिळनाडूची मुलं सुशिक्षित असून, चांगल्या इंग्रजीमुळे त्यांना आयटी क्षेत्रामध्ये रोजगार आणि चांगले वेतन मिळत असल्याचा अजब दावाही केला. मुळात खा. दयानिधी मारन आणि त्यांच्या द्रमुक पक्षाला प्रामुख्याने हिंदी, हिंदी भाषिक राज्ये आणि सनातन धर्माचा इतका तिटकारा का आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण, यापूर्वीही मुख्यमंत्री स्टॅलिन पुत्राने तर थेट सनातन धर्मावरच आगपाखड केली होती. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील तीन राज्यांमध्ये भाजपने प्रचंड विजय मिळवला. यावर द्रमुक खासदार सेंथिल कुमार यांनी छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशला ’गोमूत्र राज्य’ म्हणत, केवळ हिंदी भाषिक राज्यांमध्येच भाजप विजय मिळवत असल्याचे म्हणत, भाजपच्या विजयाची खिल्ली उडवली होती. मुळात द्रमुक हा ’इंडिया’ आघाडीचा सदस्य. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेदेखील ’इंडिया’ आघाडीत सहभागी आहेतच. मग आता मारन यांच्या हिंदी भाषिकांच्या अपमानाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार नेमके काय भूमिका घेणार? की हे बिहार सरकारचेच अपयश म्हणायचे? मजुरांच्या अपमानाचा अधिकार मारन यांना कुणी दिला? तसेच स्वच्छताकर्मींचाही एकप्रकारे अपमान करणारे हे लज्जास्पद वक्तव्य. यावर तेजस्वी यादवांनी बिहारच्या लोकांनी काम करणे बंद केले, तर तामिळनाडूतील लोकांचे जीवन ठप्प होईल, असे सांगून एक प्रकारे इशाराच दिला. पण, द्रमुकच्या हिंदी रागात आता त्यात हिंदू विरोधाचीही भर पडलेली दिसते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.