धर्मांतरानंतरही फायदे लाटणार्‍यांविरुद्ध आंदोलन!

    25-Dec-2023   
Total Views |
Janjati Suraksha Manch Natoin waide Campaign

’जनजाती सुरक्षा मंचा’चे जे राष्ट्रव्यापी अभियान सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून रांचीमधील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या ज्या मागास जाती-जमातीच्या नागरिकांनी धर्मांतर करून, अन्य धर्मांमध्ये प्रवेश केला आहे, त्यांची नावे मागास जाती-जमातींच्या सूचीमधून वगळण्यात यावीत, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

नाताळच्या आदल्या दिवशी झारखंड राज्यातील हजारो लोक ‘जनजाती सुरक्षा मंचा’च्या नेतृत्वाखाली राजधानी रांचीमध्ये एकत्र आले होते. ज्यांनी अन्य धर्मांमध्ये प्रवेश केला आहे; पण जे अजूनही मागास जनजातींना मिळणारे फायदे लाटत आहेत, अशा सर्वांची नावे मागास जनजातींच्या सूचीतून वगळण्यात यावीत, या मागणीसाठी ’जनजाती सुरक्षा मंचा’ने हे आंदोलन केले होते. या आंदोलनास अनेक हितसंबंधी गटांनी विरोध केला असतानाही, त्या विरोधास न जुमानता, हजारो लोक रांचीमधील मोरहाबादी मैदानात गेल्या दि. २४ डिसेंबर रोजी जमले होते. नाताळच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून अनेकांनी या आंदोलनास विरोध केला होता. पण, तो विरोध डावलून हजारो जनजाती समाजाचे नागरिक रांचीमध्ये एकत्र आले होते.

’जनजाती सुरक्षा मंचा’चे जे राष्ट्रव्यापी अभियान सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून रांचीमधील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या ज्या मागास जाती-जमातीच्या नागरिकांनी धर्मांतर करून, अन्य धर्मांमध्ये प्रवेश केला आहे, त्यांची नावे मागास जाती-जमातींच्या सूचीमधून वगळण्यात यावीत, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

रांचीमधील कार्यक्रमास ५० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्यांच्यापुढे बोलताना ’जनजाती सुरक्षा मंचा’चे राष्ट्रीय निमंत्रक आणि माजी मंत्री गणेश राम भगत यांनी, घटना तयार करणार्‍यांनी देशातील सुमारे ७०० हून अधिक जनजातीसाठी आरक्षण आणि अन्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. पण, या तरतुदींचा लाभ ज्यांनी आपल्या परंपरांचा त्याग करून, अन्य धर्मांचा स्वीकार केला आहे, असे लोक अजूनही घेताना दिसत आहेत. त्यामुळे मूळ जनजातीच्या नागरिकांना त्यापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे असे जे धर्मांतरित आहेत, त्यांची नावे मागास जमातींच्या सूचीमधून वगळण्यात यावीत, अशी ’जनजाती सुरक्षा मंचा’ची मागणी आहे. ज्यांनी आपल्या जनजाती परंपरा आणि प्रथा यांचा त्याग केला आहे, त्यांना मागास जमातीचे सदस्य म्हणून मानता कामा नये आणि त्यांना आरक्षणाचे लाभ देता कामा नयेत, अशीही या मंचाची मागणी आहे. रांचीमधील या सभेस अनुमती देऊ नये, अशी मागणी करणारी पत्रे काही ख्रिश्चन संघटनांनी सरकारला लिहिली होती. पण, त्याचा काही परिणाम झाला नाही. रांचीमधील सभेस उपस्थित असलेल्या नागरिकांनी धर्मांतर केलेल्या, जनजाती प्रथा-परंपरा यांचा त्याग केलेल्या लोकांची नावे मागास जमातींच्या सूचीतून वगळावीत, अशी मागणी एकमुखाने केली आहे. धर्मांतर करून मागास जमातीसाठीचे फायदे लाटणार्‍यांचे हे उद्योग यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच ’जनजाती सुरक्षा मंचा’ने दिला आहे.

अमेरिकेत हिंदू मंदिरावर भारतविरोधी घोषणा!

अमेरिकेमध्येही खलिस्तानवादी तत्त्वे सक्रिय असून, त्या तत्त्वांचा बंदोबस्त करणे अजून अमेरिकेला शक्य झाले नाही. मध्यंतरी खलिस्तान समर्थकांनी अमेरिकेतील भारतीय वकिलातीपुढे निदर्शने केल्याची घटना विसरली गेली नसतानाच, खलिस्तान समर्थकानी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनप्रमाणे आता अमेरिकेतील हिंदू मंदिरांची विटंबना करण्याचे प्रकार खलिस्तानवाद्यांनी सुरू केले आहेत. कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क येथे जे भव्य स्वामी नारायण मंदिर उभारण्यात आले आहे, त्या मंदिराच्या भिंतींवर खलिस्तान समर्थकांनी भारतविरोधी आणि खलिस्तानचे समर्थन करणार्‍या घोषणा लिहिल्या आहेत. तसेच जर्नैलसिंह भिंद्रनवाले याचा हुतात्मा असा उल्लेख केलेल्या घोषणांचाही त्यामध्ये समावेश आहे. या प्रकाराचा सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वकिलातीने तीव्र निषेध केला आहे. या घटनेचा त्वरित तपास करण्यात यावा आणि अमेरिकी प्रशासनाने अशी कृत्ये करणार्‍यांवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अमेरिकी परराष्ट्र खात्याने कॅलिफोर्निया येथील स्वामी नारायण मंदिराची विटंबना करण्याचा, जो प्रकार घडला, त्याचा तीव निषेध केला आहे. तसेच या घटनेसंदर्भात नेवार्क पोलिसांकडून जो तपास केला जात आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हिंदू मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा प्रकार स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी उघडकीस आला. या घटनेने हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या असल्याचे अमेरिकी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले. या घटने प्रकरणी पोलीस तपास करीत असून, अशा घटना आम्ही नेवार्क परिसरात घडू देणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

खलिस्तानवादी अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नू यांच्या हत्येचा कट रचण्यात भारताचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने अलीकडेच केला आहे. पण, हा पन्नू अमेरिकेत उजळ माथ्याने वावरत आहे. ’शीख फॉर जस्टीस’ या संघटनेचा प्रमुख असलेला, पन्नू भारतविरोधी कारवायांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत करीत आहे. पण, अशा भारतविरोधी तत्त्वांवर अमेरिकेकडून वेळीच कारवाई केली जात नसल्याने, त्यांच्या भारतविरोधी कारवाया वाढत चालल्या आहेत. पण, अमेरिका त्यांच्या कारवायांना पायबंद घालू शकलेली नाही. पन्नूसारखे खलिस्तानवादी अमेरिकेत मुक्काम ठोकून असतील आणि अमेरिकी सरकार त्यांच्यावर कारवाई करण्यात तत्परता दाखवणार नसेल, तर त्या देशात खलिस्तानवादी आपल्या भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू करतील, हे सांगायला नको.

द्रमुकच्या ‘फोडा आणि राज्य करा’ची नीतीचा भाजपकडून समाचार

तामिळनाडूमधील द्रमुक नेते आणि लोकसभा सदस्य दयानिधी मारन यांनी तामिळनाडू राज्यात कार्यरत असलेल्या, उत्तर भारतीय लोकांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. ”तामिळनाडू राज्यात जे उत्तर भारतीय आहेत, ते विशेष शिकलेले नसल्याने, त्यांना अत्यंत हलकी कामे करावी लागत आहेत. शौचालये साफ करणे किंवा बांधकामावर मजुरी करणे अशी कामे प्रामुख्याने त्यांना करावी लागत आहेत,” असे दयानिधी मारन यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारचा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद यांनी निषेध केला आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा वापर विरोधकांकडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रथम काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर भारतीय मतदारांचा अपमान केला, त्यानंतर तेलंगणचे नेते रेवंत रेड्डी यांनी बिहारी जनतेवर टीका केली. द्रमुक खासदार सेन्थिल कुमार यांनी ‘गौमूत्र राज्ये’ असा उल्लेख करून उत्तरेतील राज्यांचा, सनातन धर्माचा अपमान केला. आता तशीच कृती दयानिधी मारन यांनी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, असा प्रश्न भाजप प्रवक्त्याने विचारला आहे.

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनीही दयानिधी मारन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ”देशात दुही आणि असंतोष निर्माण करण्याचा यामागे प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘इंडिया’ आघाडीचे घटक असलेल्या बिहारमधील नेत्यांनी आणि पक्षांनी या वक्तव्याचा निषेध करायला हवा,” असे राय यांनी म्हटले आहे. ”पंतप्रधान मोदी एकीकडे ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणत आहेत आणि दुसरीकडे, मारन यांच्यासारखे नेते देशाची उत्तर आणि दक्षिण भारत अशी विभागणी करण्यास निघाले आहेत. पण, आम्ही असे होऊ देणार नाही,” असेही नित्यानंद राय यांनी स्पष्ट केले. द्रमुकचे विविध नेते वादग्रस्त वक्तव्ये करून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न कशा प्रकरे करीत आहेत, त्याची कल्पना यावरून यावी.

९८६९०२०७३२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.