समाजसेवेसाठी आधी 'भय आणि मोह'च्या सापळ्यातून सुटा : डॉ. अनंत पंढरे

    24-Dec-2023
Total Views |
Indian red Cross society Anant Pandhare
 
मुंबई : "भय सापळा आणि मोह सापळा यातून व्यक्ती सुटली तरच समाजसेवेत ती नीडरपणे कार्यरत होऊ शकते. सेवेचा विषय हा भावनेशी निगडित असल्याने अंत:प्रेरणेतून समाजकार्य करण्याची इच्छा असणारेच अशा प्रकारची समाजसेवा करू शकतात.", असे मत इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे (छत्रपती संभाजी नगर) वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांनी व्यक्त केले.

दि. २४ डिसेंबर रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी येथे १४वा केशवसृष्टी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी हा पुरस्कार स्नेह सावली सेंटरचे (छत्रपती संभाजी नगर) संस्थापक, अध्यक्ष डॉ. बालाजी आसेगांवकर यांना प्रदान करण्यात आला.
 
डॉ. अनंत पंढरे यावेळी म्हणाले, "परमेश्वर प्रत्येकाच्या शरीरात एक बीज पेरून मनुष्य निर्मिती करत असतो. त्यानंतर त्या बीजाचे वटवृक्षात रूपांतर कसे करावे हे त्या मनुष्याच्या हातात असते. ज्याला ते कळलं तो समाजात उत्तम कार्य करू शकतो. डॉ. आसेगांवकर यांना ते कळले असून आपल्या पत्नीसह ते या बीजाचे वटवृक्ष करण्याच्या मार्गावर आहेत."
 
डॉ.आसेगांवकर यांच्या कामाचा उल्लेख करत पुढे ते म्हणाले, " 'मला आपली सेवा करण्यात आनंद आहे', हा भाव डॉ.आसेगांवकर यांच्या चेहऱ्यावर कायम दिसतो. त्यांच्या स्नेह सावली संस्थेतील प्रत्येक वृद्धव्यक्तीसाठी ते मुलासमानच आहेत. नर्सिंग करणे कठीण काम नाही, परंतु ते करताना मनाची तयारी करणे हे खरे कठीण काम असते. अशा कामासाठी समाज सहसा पटकन पुढे सरसावत नाही. परंतु डॉ. बालाजींचे सुरू असणारे कार्य हे वाखाणण्याजोगे आहे.'
 
कार्यक्रमादरम्यान मंचावर डॉ. बालाजी आसेगांवकर, त्यांच्या पत्नी डॉ.शिल्पा आसेगांवकर, केशवसृष्टीचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, डॉ. अलका मांडके, पुरस्कार समितीच्या अध्यक्ष रश्मी भातखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमेया जाधव यांनी केले. डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, वैजयंती आपटे, रश्मी भातखळकर, हेमा भाटवडेकर, प्रा. अमेया जाधव, adv. सुनीता तिवारी, अर्चना वाडे, सुनयना नटे यांच्या निवड समितीने डॉ. बालाजी आसेगांवकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली.

जबाबदारी वाढवणारा पुरस्कार
 
आजचा हा पुरस्कार आम्हा सर्वांसाठी जबाबदारी वाढवणारा पुरस्कार आहे. वैयक्तिक फायदा सोडून सामाजिक कार्य करावे हा या कार्यामागचा खरा विचार होता. आज समाजात आजारी वृद्धांची संख्या वाढते आहे परंतु त्यांची काळजी व देखभाल करणारे क्वचितच दिसतात. त्यामुळे अशा वृद्धांचे आयुष्य सुखकर करण्याच्या उद्देशाने या कार्याची सुरुवात झाली. अशा प्रकारचे केअर सेंटर समाजात असणे आज गरजेचे झाले आहे. आजच्या पुरस्काराने स्नेह सावलीच्या पंखांना बळ मिळाले आहे. केशवसृष्टीने आमच्या कार्याला दिलेल्या पोचपावतीबद्दल त्यांचे धन्यवाद.
डॉ. बालाजी आसेगांवकर, संस्थापक, अध्यक्ष, स्नेह सावली सेंटर