मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाला नमवत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अवघ्या ७५ धावांचं लक्ष्य पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय मिळविला.
दरम्यान, चार दिवसांच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २१९ धावा केल्या होत्या. तर भारतीय संघाने सर्वबाद ४०६ धावा करत १८७ धावांची आघाडी घेतली त्याबदल्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २६१ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी ७५ धावांचे लक्ष्य दिले.
पहिल्या डावात भारताकडून स्मृती मंधाना ७५ धावा तर दीप्ती शर्माने ७८ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी विशेष कामगिरी या सामन्यात केल्याचे पाहायला मिळाले. खासकरून, फिरकी गोलंदाजांनी पहिल्या आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तसेच, राजेश्वरी गायकवाडच्या मदतीने फिरकीपटू स्नेह राणाने पहिल्या डावात ३ विकेट्स तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन संघाला तंबूत धाडले.