मुंबई : हिंदी चित्रपटांचा यंदाचे वर्ष कमाईच्या बाबतीत फारच आनंदित गेले असे म्हणण्यास हरकत नाही. २०२३ या वर्षाची सुरुवात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने दमदार केली. बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या घरात या चित्रपटाने कमाई केली. त्यानंतर वर्षाच्या मध्यांतरात ‘जवान’ चित्रपटाने बाजी मारली. परंतु, वर्षाचा शेवट जरी शाहरुखच्याच ‘डंकी’ने झाली असली तर या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली आहे. २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला डंकी चित्रपट पहिल्याच दिवशी ‘अॅनिमल’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मागे टाकू शकला नाही.
शाहरुख खानच्याच ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईपेक्षा ‘डंकी’ चित्रपटाने कमी कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटी, ‘पठाण’ने ५७ कोटी तर ‘अॅनिमल’ने ६३ कोटींची कमाई केली होती. या सर्व चित्रपटांच्या तुलनेने ‘डंकी’ने अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे.
‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले असून पहिल्यांदाच शाहरुख खान आणि हिरांनी यांनी एकत्रित काम केले आहे. या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नु, बोमन इराणी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.