'मैं अटल हुं' चित्रपटात मराठी अभिनेत्री साकारणार सुषमा स्वराज यांची भूमिका
22-Dec-2023
Total Views |
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय, कवी, सामान्य माणूस या सर्व पैलुंचा उलगडा करणारा चित्रपट 'मैं अटल हुं' पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अटलजींच्या भूमिकेत अभिनेते पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांभाळली आहे. यात पंकज त्रिपाठी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली हे ट्रेलर वरुन दिसून येत आहेच, परंतु यात आणखी एका कलाकाराने विशेष लक्ष वेधले आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका मराठी अभिनेत्री गौरी सुखटणकर हीने साकारली आहे.
अभिनेत्री गौरी सुखटणकर हिने 'पॅड मॅन', 'बेस्ट सेलर' आणि 'स्कूप' या हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारली आहे.दरम्यान, 'मैं अटल हुं' या चित्रपटात अटलजींच्या जीवनातील ८० वर्षांचा काळ दाखवण्यात आला असून यात त्यांच्या जीवनातील बालपणीपासून ते देशाचे पंतप्रधान होईपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींना मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.