नवी दिल्ली : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून उपस्थित राहणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर येणार आहेत.
भारत आणि फ्रान्समध्ये विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर धोरणात्मक भागिदारी आहे. यंदाच्या वर्षी भारत – फ्रान्स धोरणात्मक भागिदारीचा २५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जुलै २०२३ रोजी पॅरिसमध्ये आयोजित बॅस्टिल डे परेडमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान जी२० शिखर परिषदेसाठी भारतात आले होते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.