नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे सिसोदियांचे नवे वर्षही तुरुंगातच जाणार आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी आप नेते मनिष सिसोदिया हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत गुरुवारी संपल्यानंतर त्यांना राऊझ अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, दोषारोपपत्राशी संबंधित सर्व कागदपत्रे सर्व आरोपींना देण्यात आली आहेत.
न्यायालयाने यावेळी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना आरोपपत्राची प्रत डीव्हीडी स्वरूपात आरोपींना पुरवण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वकिलांवर नाराजी व्यक्त करून न्यायालयाने त्यांच्यावर खटल्याची सुनावणी लांबवित असल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.