वादग्रस्त ‘ट्रम्प युग’

    21-Dec-2023
Total Views |
Trump Declared Ineligible For White House

व्यवसायाने उद्योगपती तसेच दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेले, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युग वादग्रस्तच राहिले. आपल्या कारकिर्दीतील प्रत्येक भूमिकेला न्याय देताना, ते घेत असलेला आक्रमक पवित्रा कधी-कधी त्यांना संकटात ओढून नेत असतो. २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा दुर्दैवाने पराभव झाला. त्यानंतर दि. ६ जानेवारी २०२१ रोजी या निकालाविरोधात अमेरिकेतील ट्रम्पसमर्थकांनी तेथील कॅपिटॉल इमारतीत घुसून हिंसाचार केला आणि निवडणूक निकाल उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना २०२४ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास नुकतेच अपात्र घोषित केले. या निर्णयामुळे अमेरिकेच्या जनतेला विशेष करून, रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अर्थात, याप्रकरणी ट्रम्प यांना कायदेशीरदृष्ट्या आपली बाजू मांडण्याची संधी असून, त्यानंतरच अंतिम निर्णय होईल.
 
अमेरिकेतील कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले असले, तरी अमेरिकेच्या जनतेच्या मनातील ‘भावी राष्ट्राध्यक्ष’ म्हणून ट्रम्प यांची प्रतिमा कायम आहे. नुकत्याच झालेल्या प्राथमिक सर्वेक्षणात अन्य उमेदवारांपेक्षा ट्रम्प यांना सर्वाधिक पसंती असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. ट्रम्प यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय अमेरिकेच्या राज्यघटनेच्या नियमांनुसार घेण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला घटनेच्या ’१४’व्या दुरुस्तीच्या ’कलम ३’चा वापर करून अपात्र ठरवण्यात आले आहे. ट्रम्प यांना अपात्र घोषित करणे, ही बाब अमेरिकेतील सुजाण मतदारांना रुचणारी दिसत नसून, न्यायालयाच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातून ट्रम्प यांच्या समर्थकांत आणि लोकप्रियतेत अधिक भर पडताना दिसते.

दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या, त्यात डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांचा अनपेक्षित विजय झाला असल्याचे म्हटले जाते. मतदान आणि मतमोजणीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी ट्रम्प यांनी अनेक राज्यांत खटले दाखल केले. बहुतांश घटनांमध्ये ट्रम्प समर्थकांचे अपिल फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही दोन प्रकरणांमध्ये याचिका फेटाळल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. त्या हिंसाचारासाठी अमेरिकन काँग्रेस समितीने ट्रम्प यांना जबाबदार धरले. ट्रम्प यांच्या अनेक साथीदारांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिली. त्यात तत्कालीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅथ्यू पॉटिंगर आणि उप प्रेस सचिव सारा मॅथ्यू यांचा समावेश होता. त्यामुळे ट्रम्प यांची बाजू कमकुवत झाली. त्यातूनच त्यांच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिला.

ट्रम्प यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग या घटनेत नसला, तरी न्यायालयाने नोंदविलेल्या निष्कर्षात एक गट ट्रम्प यांना हिंसाचार थांबवण्यास सांगत होता. त्यात त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचाही समावेश होता. दुसर्‍या गटात ट्रम्प यांचे काही सल्लागार होते. या प्रकरणी ते तटस्थ होते. कारवाई करणे आवश्यक आहे, हे त्यांना माहीत होते; परंतु ट्रम्प त्वरित कारवाई करणार नाहीत. तिसरा गट विक्षेपित-दोष वर्ग होता. यामध्ये ‘व्हाईट हाऊस’चे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांचा समावेश होता. या गटाने म्हटले आहे की, जे हिंसाचार करत होते, ते ट्रम्प समर्थक नव्हते. मात्र, न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करत निकाल दिला.ट्रम्प यांना निवडणूकबंदी केली असली, तरी त्यांचे युग सहजासहजी संपणारे नाही. त्यांनी आजवर केलेला संघर्ष पाहता, तसेच आगामी निवडणुकीसाठी त्यांना मिळत असलेली, सर्वाधिक पसंती दुर्लक्षित करता येणार नसल्याचे, अमेरिकेतील विधिज्ञांचे म्हणणे. निवडणूकबंदीच्या निकालाला ट्रम्प कसे आणि काय आव्हान देतात, हे येत्या काळात दिसेलच. त्यानंतरच ट्रम्प युगाचा अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा उदय होईल की अस्त, हे स्पष्ट होणार. मात्र, त्यांची कारकिर्द जगाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल, एवढे मात्र निश्चित!



- मदन बडगुजर