नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी सर्व राज्यांना दर 3 महिन्यांनी एकदा सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना हिवाळ्याच्या हंगामात थंडीबाबत खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे आगामी सणासुदीचा हंगाम पाहता, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आसाम, अरुणाचल, दिल्ली, हरियाणा, हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, गोवा, पुद्दुचेरी, तेलंगणा, कर्नाटक, मणिपूर, केरळ या राज्यांसह इतर राज्यांचे आरोग्य मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते.दरम्यान, बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात करोनाचे एकूण 341 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 292 प्रकरणे केरळमधील आहेत.