भक्तांसाठी धावून येणारा श्रीहरी...

    20-Dec-2023   
Total Views |
Samarth Pray for Devotionality

भगवंताने गजेंद्राला मृत्यूच्या दाढेतून सोडवले म्हणून या कथेला ‘गजेंद्रमोक्ष’ असे नाव दिले गेले. गजेंद्राने आपल्या सोंडेतील कमलपुष्प ईश्वरचरणी वाहून आपली भक्ती व कृतज्ञता व्यक्त केली. देवाला भक्ताचा अभिमान असतो. तो भक्ताची उपेक्षा करीत नाही.

समर्थांनी श्लोक क्र. ११६ पासून पुराणातील कथांचे संदर्भ द्यायला सुरुवात केली, हे आपण मागील लेखांतून पाहिले. या पुराणकथा एकामागून एक आठवतील तशा स्वामी सांगत गेले, असे म्हणता येत नाही. पुराणकथा सांगण्याचा क्रम निवडण्यात स्वामींची तर्कसंगत बुद्धी त्यातून दिसून येते. समर्थांच्या निवेदन शैलीचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपल्या सांगण्यातून श्रोत्यांच्या मनात काही शंका किंवा संशय उत्पन्न होईल असे वाटले तर, स्वामी ती शंका स्वत:च उपस्थित करून त्या शंकेचे निरसन करतात. दासबोध वाचताना हे जाणवतेे. तथापि, मनाच्या श्लोकांच्या निवेदनाचा ओघ शीघ्रगतीचा असल्याने त्यातील तर्कसंगती आपल्याला शोधून काढावी लागते. स्वामींनी ‘देव भक्तांची उपेक्षा करीत नाही’ यासाठी सर्वप्रथम अंबरीष राजाची कथा सांगितली, त्यामुळे श्रोत्यांना असे वाटण्याची शक्यता आहे की, देव राजासारख्या श्रीमंत भक्ताची उपेक्षा करीत नाही.

श्रोत्यांच्या मनातील अशा कल्पनेचे निराकरण व्हावे, म्हणून स्वामींनी लगेच त्यापुढे अत्यंत गरीब, दरिद्री ऋषिपुत्र बालक उपमन्यूच्या कथेचा उल्लेख केला आहे. देव आपल्या भक्तांत श्रीमंत-गरीब असा भेदभाव करीत नाही, हे यातून स्पष्ट होते. देव अनन्य भक्ती पाहतो, भक्ताची सांपत्तिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा पाहत नाही. भक्तांचा त्याला अभिमान असतो, हे उपमन्यूच्या कथेतून स्पष्ट होते. श्रोत्यांच्या मनात पुन्हा अशी शंका येण्याची शक्यता आहे की, देवाला उपमन्यूच्या गरिबीचा कळवळा आल्याने त्याने उपमन्यूला दुधाचा सागर भेट दिला असेल. ही गरिबीच्या कळवळ्याची शंका दूर करण्यासाठी स्वामींनी लगेच अपमानीत राजपुत्र धु्रवबाळाची कथा घेऊन भक्तीला असलेले प्राधान्य दाखवून दिले. पुराणकथांचा क्रम निवडण्यात एक तर्कसंगती आहे, हे यातून स्पष्ट होते.

असे असले तरी शंकेखोर माणसाच्या मनांतील शंका थांबत नाहीत. अशा माणसाला या सर्व कथा ऐकून असे वाटण्याची शक्यता आहे की, देव फक्त मानवी जीवांना मदत करतो व त्यांचाच त्याला अभिमान असतो. असे तर नाही ना? या सृष्टीत मानवी जीवांबरोबर इतरही प्राणी आहेत. त्या वन्य प्राण्यांना देवानेच निर्माण केले आहे. मग फक्त मनुष्यप्राण्यावरच देव कृपा का करतो? देवाने पशू पक्षी वन्यप्राणी सार्‍यांची काळजी घ्यायला हवी. त्यातही काही भक्त असतील, तर त्यांचाही अभिमान देवाला हवा. अशा शंका कोणी उपस्थित करू नये म्हणून स्वामींनी लगेच पुराणांतील वन्यप्राण्यावर आधारित गजेंद्रमोक्षाची कहाणी सांगायला सुरुवात केली हे पुढील श्लोकातून दिसते.
गजेंद्र महां संकटीं वास पाहे।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे।
उडी घातली जाहला जीवदानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥
भक्त संकटात मोठ्या आकांताने जेव्हा भगवंताचा धावा करतो, तेव्हा देव भक्तांच्या मदतीला धावून जातो व त्याला संकटातून सोडवण्यासाठी साहाय्य करतो. महाभारतातील कथेनुसार पांडव युद्धात हरल्यावर दु:शासनाने द्रौपदीला बळाचा वापर करून दरबारात आणले. आपले पती पाच पांडव शूरवीर असल्याने ते आपली सुटका करतील, असे द्रौपदीला वाटत होते. पण, युद्धात हरल्याने ते काहीही करू शकत नव्हते. त्यांची अगतिकता पाहून द्रौपदीने आकांताने श्रीकृष्णाचा धावा केला. दु:शासनाने द्रौपदीच्या वस्त्रांना हात घालताच भगवान श्रीकृष्णाने अखंड वस्त्रे पुरवून पांचालीच्या अब्रूचे रक्षण केले. वन्यपशूंच्या बाबतीतही देव साहाय्य करतो, असे ही पुराणातील गजेंद्र-मोक्षाची कथा सांगते. त्या कथेचा उल्लेख समर्थांनी वरील श्लोकात केला आहे.

हत्ती हा प्राणी कळप करून राहणारा वन्यप्राणी आहे. हत्तींच्या कळपातील बलाढ्य हत्ती कळपाचा मुख्य असतो; त्याला या पुराणकथेत ‘गजेंद्र’ म्हटले आहे. देवांचा राजा जसा इंद्र तसा हत्तींच्या कळपाचा प्रमुख म्हणून तो ‘गजेंद्र.’ हत्तीला जलक्रीडा अतिशय प्रिय असते. असा हा गजेंद्र आपल्या राण्यांना बरोबर घेऊन एका खोल सरोवरात जलक्रीडा करण्यासाठी उतरला. त्याच सरोवरात एक बलाढ्य मगर राहत होती. ती त्या तलावात विश्रांतीसाठी येऊन राहत असे. तो तलाव आपल्याच मालकीचा आहे, असे समजून तो इतरांना तेथे येण्यास मज्जाव करीत असे. मगर या प्राण्याचे वैशिष्ट्य असे की, तो जमिनीवर व पाण्यातही राहू शकतो. पाण्यात तो अधिक बलवान असतो. अशी ही मगर पाण्यात तलावाच्या तळाशी विश्रांती घेत पडलेली होती. गजेंद्राबरोबर आलेला हत्तींचा कळप एकदम पाण्यात शिरल्याने तलावाच्या पाण्यात मोठाले तरंग उत्पन्न होऊन ते तळापर्यंत पोहोचले. तेथे पहुडलेल्या मगरीचा विश्रांतीभंग झाल्याने तो वर येऊ लागला. मगरीची ताकद पाण्यात अधिक असते. हत्तीची ताकद जमिनीवर खूप असली तरी पाण्यात त्याचे काही चालत नाही. मगर वर येऊ लागताच गजेंद्राने सर्वांना पाण्याच्या बाहेर जाण्यास सांगितले.

परंतु, मगरीने झपाट्याने गजेंद्राचा पाय जबड्यात पकडला. मगरीच्या जबड्यात काही सापडले, तर ते बाहेर येणे कठीण. मगर गजेंद्राला तलावाच्या किनार्‍यावर जाऊ देईना. गजेंद्राने ताकदीने लढा दिला. पण, आता आपली ताकद संपत असून आपला अंत:काळ जवळ आला आहे, हे समजल्यावर मोठ्या आंकाताने त्याने विष्णूचा धावा केला. आपल्या सोंडेत त्याने देवासाठी कमळाचे फूल ठेवले होते. भगवान विष्णूंनी, आपला भक्त गजेंद्र प्राणांतिक संकटात आहे, हे पाहून भूतलावर उडी घेतली आणि आपल्या सुदर्शन चक्रांच्या साह्याने त्या मगरीचा जबडा फाडला. गजेंद्राला मगरीच्या जबड्यातून सुखरुप बाहेर काढले. भगवंत जीवदानी ठरला. भगवंताने गजेंद्राला मृत्यूच्या दाढेतून सोडवले म्हणून या कथेला ‘गजेंद्रमोक्ष’ असे नाव दिले गेले. गजेंद्राने आपल्या सोंडेतील कमलपुष्प ईश्वरचरणी वाहून आपली भक्ती व कृतज्ञता व्यक्त केली. देवाला भक्ताचा अभिमान असतो. तो भक्ताची उपेक्षा करीत नाही. संकटात उडी घालून तो भक्ताला जीवदान देतो, असे या कथेतून सुचवायचे आहे.

७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..