१६० पात्र गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

    20-Dec-2023
Total Views | 37
MHADA Mill Workers Get Homes

मुंबई :
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत नुकतेच सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन आदी उपस्थित होते.

आमदार सुनील राणे म्हणाले की, आतापर्यंत सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १४७० गिरणी कामगारांना १५ जुलै, २०२३ पासून आठ टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू आहे. या गिरणी कामगार / वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले.

बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार / वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला दि. १४ जानेवारी, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गिरणी कामगार/ वारसांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील राणे यांनी यावेळी केले. या अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे सुरू आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121