युरोपचा नवा भारतमित्र!

    20-Dec-2023   
Total Views |
Dutch politician Geert Wilders shares missive for India after

मुस्लीम मानसिकतेवर भाष्य करणारा ’फितना’ हा लघुपट प्रदर्शित केला, म्हणून जगभरातल्या मुस्लीम दहशतवादी संघटनांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गेले तीन दशकं ते आणि त्यांचे कुटुंब पोलीस संरक्षणात जगत आहेत. दहशतवादी मानसिकतेविरोधात विचारकार्य करता करताच, ती व्यक्ती म्हणजे ग्रीट वाइल्डर्स. आज ते नेदरलॅण्ड्सचे पंतप्रधान झाले.

’युरोपियन राष्ट्रवादाचा इस्लामिक मानसिकतेवर विजय’ अशा आशयात ग्रीट वाइल्डर्स यांच्या विजयाचे अभिनंदन युरोपभर केले जात आहे. मात्र, त्यांच्या विजयाबद्दल सीएमओ (कॉन्टॅक बॉडी ऑफ मुस्लीम अ‍ॅण्ड गव्हर्नमेंट) या नेदरलॅण्ड्सच्या प्रमुख मुस्लीम संघटनेचा प्रमुख मुहसिन कोक्टास याने म्हटले की, ”कायद्याच्या विरोधात बोलणार्‍या नेत्याचा पक्ष जिंकेल आणि हा नेता पंतप्रधान बनेल, अशी अजिबात आशा आम्हाला नव्हती. हा आमच्यासाठी मोठा झटका आहे.”असो.

निवडणुकीपूर्वी ग्रीट वाइल्डर्स मुस्लीमविरोधी आहेत आणि आम्ही उदारमतवादी असे म्हणून नेदरलॅण्ड्सच्या तीन प्रमुख राजकीय पक्षांनी ग्रीट यांच्यासोबत युती करण्यास नकार दिला होता. कारण, नेदरलॅण्ड्समध्ये ख्रिश्चनांनंतर मुस्लिमांची लोकसंख्या जास्त. नेदरलॅण्ड्समध्ये १७.४ टक्के मुस्लीम आहेत. मुस्लीम दहशतवादाने नेदरलॅण्ड्सलाही अस्वस्थ केलेच आहे. मागे मोरोक्को हरल्यावर फ्रान्समध्ये जी दंगल उसळली होती, तेव्हा नेदरलॅण्ड्समध्येही दंगल झाली होती. अशा नेदरलॅण्ड्समध्ये ग्रीट यांनी म्हटले की, ”नेदरलॅण्ड्समध्ये मुस्लीम शरणार्थींना प्रवेश देऊ नये. तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि मदरशांना परवानगी देऊ नये.

हिजाबवर बंदी आणावी आणि कुणाला हिजाब घालायचाच असेल, तर त्यासाठी सरकारने कर लावावा. तसेच दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याचे नेदरलॅण्ड्सचे राष्ट्रीयत्व तत्काळ रद्द करावे.” ग्रीट यांच्या या विधानामुळे नेदरलॅण्ड्समध्येही वादळ उठले. असहिष्णू धर्मात तेढ माजवणार्‍या देशात फूट पाडणारा वगैरे म्हणत, तिथेही काही राजकीय पक्ष पुढे आलेच. मात्र, ग्रीट त्यांच्या विधानावर कायम राहिले. ”नेदरलॅण्ड्समध्ये नेदरलॅण्ड्सची संस्कृती, धर्म अबाधित राहायला पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे, इस्लाम नको,” असेही ते म्हणाले. त्यामुळे नेदरलॅण्ड्सचे मुस्लीम ग्रीट यांच्या विरोधातच!
कोण आहे ग्रीट? तर ग्रीट नेदरलॅण्ड्सच्या वाईल्डर्स पार्टी फॉर फ्रीडम (पार्टिज वूर डी व्रिजहीद - पीव्हीव्ही)चे संस्थापक आहेत. तरूण वयात म्हणजे अगदी विशीत असतानाच १९८२-८३ मध्ये ते मध्य-पूर्वेतील आखाती देशांमध्ये गेले होते. मुस्लीम जीवन, त्यांचे धार्मिक सामाजिक जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. त्याचदरम्यान त्यांनी इस्रायललाही भेट दिली होती. या देशांमधील लोकांचे जीवन पाहून, ग्रीट यांच्या तरूण मनावर खूपच परिणाम झाला. त्याच काळात नेदरलॅण्ड्समध्ये याच मुस्लीम देशामधून मोठ्या प्रमाणात शरणार्थी म्हणून लोक येऊ लागले.

काही वर्षांतच नेदरलॅण्ड्समध्येही धार्मिक उन्माद सुरू झाला. पुढे २००४ साली एक अशी घटना घडली की, ज्यामुळे ग्रीट यांचे आयुष्यच बदलले. नेदरलॅण्ड्सच्या थियो वैन गॉग आणि हिर्सी अली यांनी ’सबमिशन’ नावाचा चित्रपट बनवला. त्यामध्ये मुस्लीम महिलांचे जगणे दाखवले होते, इस्लामवर भाष्य केले होते. हा चित्रपट बनवला म्हणून मोहम्मद बौएरी या धर्मांधाने थियो वैन गॉग यांचा खून केला. वैन गॉगच्या मृत्यू ग्रीट यांना अंतर्बाह्य बदलून गेला. देशामध्ये दहशतवादाविरोधात जागृती आणि बदल आणण्यासाठी त्यांनी २००६ साली ‘वाइल्डर्स पार्टी फॉर फ्रीडम’ स्वतःचा पक्ष निर्माण केला.

ग्रीट कायमच भारताचे समर्थन करतात. ’कलम ३७०’ हटवल्यावर ते म्हणाले की, “पाकिस्तान १०० टक्के दहशतवादी देश आहे. भारताचे अभिनंदन!“ तसेच नुपूर शर्मा प्रकरणात ”भारताने कुणाचीही माफी मागू नये. असहिष्णूंपुढे सहिष्णूंनी झुकू नये,” असेही म्हणणारे ग्रीटच. आता पंतप्रधान झाल्यावर ते म्हणाले की, ”मी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या हिंदूंसोबत आहे. ज्यांच्यावर पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हल्ले होतात, जीवे मारण्याची धमकी दिली जाते आणि खोटे गुन्हे दाखल केले जातात.” पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराबद्दल बोलणार्‍या ग्रीट यांना जगभरच्या हिंदूंचे समर्थन मिळणारच! युरोपात भारताचा ताकदीनिशी उदयास आलेला असा मित्र!
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.