सुवर्ण क्षणाचे साक्षीदार!

    20-Dec-2023   
Total Views |
Article on Dimple Publication Owner Ashok Mule

‘डिंपल पब्लिकेशन’ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानिमित्ताने ‘डिंपल’चे सर्वेसर्वा अशोक मुळे यांचा जीवनप्रवास...
अशोक नारायण मुळे यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे वडील बॉम्बे डाईंगमध्ये गिरणीत कामाला तर आई गृहिणी. यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. नंतर त्यांनी प्रार्थना समाज विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अशोक मुळे हे मुंबईतील विलेपार्ल्याचे असल्याने सांस्कृतिक, साहित्यिक गोष्टींची आवड त्यांना लहानपणापासूनच. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने अशोक मुळे हे इयत्ता आठवीत असताना, घरोघरी वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करायचे. नववीत त्यांनी केदार वाचनालयात अर्धवेळ नोकरी सुरू केली. त्यामुळेच कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त वाचनालयात नोकरीला असल्यामुळे, त्यांना साहित्याची गोडी निर्माण झाली. माध्यमिक शिक्षणानंतर मुळे यांना हलाखीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे आणि वडिलांच्या सेवानिवृत्तीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर ते ‘पॅथोलॉजी टेक्निशियन’ म्हणून एका दवाखान्यात रुजू झाले, तरीदेखील साहित्यिक, सांस्कृतिक वातावरणात ते अधिक रमले.
त्यावेळी ’मराठी माणसाने नोकरी मागणार्‍यापेक्षा नोकरी देणारे बनावे’ या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याने प्रेरित होऊन अशोक मुळे यांनी दि. २६ जानेवारी १९७५ ला ‘मीरा प्रकाशना’ची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी प्रथमच ज्येष्ठ नाटककार सुरेश चिखले यांची ’गमभन’ ही पहिली कादंबरी प्रकाशित केली. त्यानंतर एक हौशी प्रकाशक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. मुळात अशोक मुळे यांना कुठलीच साहित्यिक किंवा प्रकाशन व्यवसायाची पार्श्वभूमी माहीत नव्हती. सुरुवातीला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून, नोकरी करून मुळे यांनी पत्नी नम्रता मुळे यांच्या सहकार्याने या प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवले. त्यावेळी त्यांनी जवळ-जवळ ३४ वर्षं सांताकू्रझ येथील सुप्रसिद्ध डॉ. किशोर नायमपल्ली यांच्याकडे सकाळी ८ ते ४ या वेळेत नोकरी आणि नंतर प्रकाशन व्यवसाय अशा दोन्ही गोष्टी सशक्तपणे पेलण्याचे काम केले. त्यामुळेच प्रकाशन व्यवसायाने मला आर्थिक स्थैर्य, प्रसिद्धी, आत्मविश्वास, आनंद आणि चांगले मित्र दिल्याचे अशोक मुळे आवर्जून सांगतात.
विशेष म्हणजे बंधू माधव, प्रिया तेंडुलकर, शांता जोग, लालन सारंग, डॉ. नेहा सावंत, ज्योती निसळ, डॉ. अमोल कोल्हे, कुलगुरू सुहास पेडणेकर आदींचं पहिली पुस्तक ’डिंपल पब्लिकेशन’ने प्रकाशित केली. त्यामुळे हौशी प्रकाशक म्हणून मुळे यांचा सुरू झालेला प्रवास दर्जेदार पुस्तकांमुळे व्यावसायिकतेकडे वळला. सुरुवातीच्या काळात अशोक मुळे यांच्याजवळ पुरेसा पैसा, छपाईविषयीची किंवा व्यवसायातील खाचाखोचांची पुरेशी माहिती नव्हती. तरीदेखील प्रकाशन व्यवसायात आपलं नशीब आजमवण्यासाठी ते धडपडत राहिले आणि नामवंत लेखकांनी त्यांना लेखन साहाय्यही देऊ केले. आज त्यांच्या ’डिंपल पब्लिकेशन’ची एक हजार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
या प्रदीर्घ वाटचालीत अशोक मुळे यांना भाऊ पाध्ये, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, केशव मेश्राम, माधव गडकरी, शिरीष पै, आनंदीबाई विजापुरे, राजेंद्र पै, सतीश दुभाषी, वसंतराव शिरवाडकर, सुशीलकुमार शिंदे, शशी भालेकर, संदेश जाधव, दिवाकर गंधे यांसारख्या अनेक ज्ञात-अज्ञात दिग्गजांचा भरभक्कम पाठिंबा लाभला. त्यामुळे ’डिंपल पब्लिकेशन’ दि. २६ जानेवारीला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. हा एका हौशी प्रकाशकाचा प्रवास खाचखळग्यातून मार्ग काढत, यशस्वीतेकडे जाणारा. पण, या सगळ्यात ’कोरोना’सारख्या महारोगाच्या काळात आर्थिक अडचणींना देखील अशोक मुळे जिद्दीने सामोरे गेले. त्यावेळी ही सहा ते सात पुस्तक ’डिंपल पब्लिकेशन’ने प्रकाशित केली.
पण, सुरुवातीची १५-२० वर्षं खरंतर अशोक मुळे यांच्या कसोटीची वर्षं होती. कारण, त्यांनी ’डिंपल’ला अनेक मित्र जोडून घेतले असले, तरी मुळे हे ‘डिंपल’चे एकखांबी तंबू होते. मात्र, मध्यंतरी ते गंभीर आजारी होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी नम्रता मुळे आणि मुलगा कौतुक मुळे यांच्या सहकार्याने ‘डिंपल’चा हा बहरलेला वटवृक्ष नव्याने उभा राहिला. आज मुंबई महापालिका मुख्यालयात ही ‘डिंपल पब्लिकेशन’चे पुस्तक विक्री केंद्र आहे. जिथे १५ टक्के सवलतीत वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच मुळे हे वसईच्या ‘साहित्य जल्लोष प्रतिष्ठान’चे प्रमुख विश्वस्त आणि कार्याध्यक्ष आहेत. ‘साहित्य जल्लोष’तर्फे गेल्या २० वर्षांपासून साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम वसईत आयोजित केले जातात. तसेच मुळे हे पुस्तक प्रकाशनाचे अनेक कार्यक्रम ही वसईत राबवत असतात.
त्याचबरोबर ’डिंपल पब्लिकेशन’च्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’, ‘दमाणी पुरस्कार’, ‘महाराष्ट्र साहित्य पुरस्कार’, कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणेचा ‘ग्रंथमित्र पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच अशोक मुळे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा १९८९ साली ‘वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार’ आणि ’आयकॉन फाऊंडेशन’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला आहे. दि. २६ जानेवारी २०२४ ला सुवर्ण महोत्सवी वर्षात ’डिंपल’ पदार्पण करत आहे, तरी डिंपलच्या प्रवासाला आणि अशोक मुळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.