मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मनाभजी आचार्य यांचे शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभाविप, भाजप मुंबई आणि विद्यानिधी शिक्षण संकुल यांच्यातर्फे मुंबईत दि. ०२ डिसेंबर रोजी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर सहकार्यवाह विलास भागवत, विद्यानिधीचे उपनगर शिक्षण मंडळ उपाध्यक्ष रमेश मेहता, पद्मनाभजींचे सुपुत्र लेखक दिग्दर्शक चारुदत्त आचार्य, अभाविपचे पूर्व कार्यकर्ता अतुल कुलकर्णी आदी मंडळींनी पद्मनाभजींना शब्दसुमनांजली वाहिली. पद्मनाभजींच्या जीवनप्रवासातील निरनिराळ्या आठवणींना यावेळी मान्यवरांकडून उजाळा देण्यात आला.
पद्मनाभजींचे पूर्वोत्तर भारतातील किस्से सांगताना काही जण म्हणाले, "त्या ठिकाणी असणाऱ्या राजभवनातील प्रत्येकाशी त्यांचे व्यक्तिगत नाते होते. अतिशय उल्लेखनीय असे त्यांचे संपर्क कौशल्य होते. आजच्या पिढीचे भविष्य घडवू शकतो असा पद्मनाभजींचा संपूर्ण जीवनपट होता. त्यांचे ईशान्य भारतात प्रचंड मोठे योगदान होते. संघटनेचे काम कशाप्रकारे करायचं आणि कशाप्रकारे ते करवून घ्यायचं याचं विशेष कौशल्य त्यांच्याकडे होते."त्यांच्या राज्यपाल पदाबाबत सांगताना काहीजण म्हणाले, "ते राज्यपाल असूनही अतिशय सामान्य व्यक्तिमत्व म्हणून कायम ते जगले. त्यांच्याशी कोणाचे मतभेद असले तरी मनभेद कधीही नव्हते. कायम राष्ट्रप्रथम हीच भावना त्यांची असायची. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी जोडून घेणे हाच विचार कायम ते करायचे. जबरदस्त आत्मविश्वासाने जगलेले ते एक कार्यकर्ता होते."
कॉलेज कॅन्टीनच्या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा प्रवासाच्या आठवणी यावेळी विशेष लक्षकेंद्रित करणाऱ्या होत्या. कारण आपल्या संघटनेचे काम हे या कॅन्टीनच्याच माध्यमातून वाढत जाईल हा विचार त्यांनी त्यावेळी केला होता. कॅन्टीनमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांशी, युवकांशी त्यांच्या घनिष्ठ संपर्क असायचा. श्रद्धांजली सभेदरम्यान त्यांच्या सहवासात असणारे अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवक उपस्थित होते.
आजन्म अभिनव कार्य करणारे 'आचार्य'
आजची श्रद्धांजली सभा ही पद्मनाभजींच्या जीवन कार्याला सन्मान देणारी सभा आहे. आपल्या जीवनात त्यांनी आजन्म अभिनव कार्य केले. राज्यपाल म्हटलं की बऱ्याच जणांच्या भेटीगाठी आपसूक होत असायच्या. परंतु आचार्यजी मात्र स्वतःहून अनेकांना बोलवायचे. त्यांच्याप्रमाणे आपण सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू हीच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल.- राम नाईक, माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश
पद्मनाभजींच्या मार्गावर चालणे हीच श्रद्धांजली
बोफोर्स स्कॅमच्यावेळी झालेल्या आंदोलनात पद्मनाभजींचा विशेष सहभाग होता. त्यांचा आवाज हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या आवाजात एकसुरीपणा होता. त्यांच्या प्रेरणेतून, त्यांनी केलेल्या कार्याच्या मार्गावर आपण जगणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.- अॅड. आ.आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष