मुंबई : दहावी-बारावीनंतर काय पुढे काय, हा प्रत्येक विद्यार्थ्याला सतावणारा प्रश्न. त्यातील अनेकजणांना वेळीच मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांची करिअर निवड चुकते आणि भविष्यात अनेक संधींना मुकावे लागते. ही बाब ध्यानात घेऊन कौशल्य विकास विभागाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना असून, डिसेंबर महिन्यापासून मुंबईत सर्वत्र या उपक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
पारंपारिक शिक्षण मुलांना आर्थिकदृष्टया रोजगारक्षम बनविण्यास उपयुक्त ठरेलच असे नाही; मात्र कौशल्य प्रशिक्षण हे मुलांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून देत असते. त्यामुळे युवा पिढीला रोजगारक्षम बनवण्याच्या हेतूने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपनगरातील ३२८ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या ३२८ शाळांमध्ये शिकणाऱ्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या तब्बल ५५ हजार विद्यार्थ्यांना या माध्यमातून करिअरच्या वाटा निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी दोन तज्ज्ञ मार्गदर्शक नियुक्त केले जाणार असून, ते प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहे. प्रति शाळा ४ तास, असा वेळ साध्य ठरवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दहावी आणि बारावी हा करिअरचा पाया मानला जातो. त्यामुळे या टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून, युवा पिढीला रोजगारक्षम बनवण्याचा आमचा हेतू आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
- मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री