सूर्यासम तेजस्वी अजेय योद्धा..'शिवरायांचा छावा' अवतरणार, पोस्टरने वेधलं लक्ष
19-Dec-2023
Total Views | 48
मुंबई : शिवरायांचा इतिहास बऱ्याच चित्रपटांतून आजवर दाखवला गेला. परंतु दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात स्वराज्यासाठी प्राण वाहिलेल्या मावळ्यांनाचा इतिहास देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला. आता दिग्पाल लांजेकर यांनी मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. आता हाच इतिहास रुपेरी पडद्यावर येणार असून शिवरायांचा छावा या चित्रपटात तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत.