मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार - देवेंद्र फडणवीस

    19-Dec-2023
Total Views |
 jayakwadi
 
नागपूर: ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून, यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधान परिषदेत दिली.
 
मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुरार्णी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.
 
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो. न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.