“कमाईच्या स्पर्धेमुळे फिल्ममेकिंगचा आत्मा हरवला”, मनोज वाजपेयींनी व्यक्त केली खंत

‘अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर’चा मनोज बाजपेयींच्या ‘जोरम’ला फटका; संतापून वायपेयी म्हणाले..”फिल्ममेकिंगचा आत्मा हरवला”

    19-Dec-2023
Total Views |

manoj vajpayee
 
मुंबई : हिंदी चित्रपटांसाठी २०२३ हे वर्ष तसे आनंदी गेले असे म्हणण्यास हरकत नाही. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली होती आणि त्याचा शेवट आता त्याच्याच 'डंकी' चित्रपटाने होणार आहे. मात्र, असे असले तरी १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर या दोन चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली. मात्र, याचा फटका ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या मनोज वाजपेयीच्या जोरम चित्रपटाला बसला आहे. याबद्दल मनोज वाजपेयी यांनी खंत व्यक्त केली असून बॉक्स ऑफिसवरील कमाईबाबत त्यांनी स्वत:चे रोखठोक मत व्यक्त केले आहे.
 
‘जवान’, ‘पठाण’, ‘गदर २’ यांच्या पाठोपाठ अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर यांनी देखील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली. परंतु ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ यांच्यातील बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत ‘जोरम’कडे प्रेक्षकांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं असं मनोज बाजपेयी यांनी मत मांडले आहे. मनोज वाजपेयी यांनी ‘न्यूज १८’शी संवाद साधताना म्हटले, “मी कायमच बॉक्स ऑफिस कमाईबद्दल, अट्टहासाच्या विरोधात भाष्य केले असून या कमाईच्या स्पर्धेमुळे फिल्ममेकिंगचा आत्मा हरवला आहे. प्रेक्षकांच्या तोंडावर कमाईचे आकडे फेकून मारणे हे काही योग्य नाही,” असेही त्यांनी म्हटले.
 
पुढे ते असेही म्हणाले की, “प्रेक्षक देखील चित्रपटांच्या कमाईचे आकडे सांगतात, त्यांना असं वाटतं की एखाद्या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली म्हणजे तो उत्तम चित्रपटच आहे. हा दृष्टिकोनच चित्रपटसृष्टीसाठी फार धोकादायक आहे. या एका गोष्टीमुळे चित्रपटसृष्टीतील कित्येक लोकांच्या कल्पकतेचे, विचारांचे प्रचंड नुकसान केले आहे.”
 
मनोज बाजपेयी ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ बद्दल म्हणाले की, “मला माहित आहे की हे दोन्ही बिग बजेट चित्रपट आहेत, त्यांच्यावर प्रचंड पैसा निर्मात्यांनी खर्च केला आहे. पण ‘जोरम’सारख्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तेवढे पैसे खर्च करणे आम्हाला शक्य नाही आहे, कारण हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. आम्ही त्याच्या प्रमोशनसाठी ठराविक पैसाच खर्च करू शकतो. आम्हाला चित्रपटावर उगाच दबाव टाकायचा नव्हता, कारण शेवटी त्यातून नफा कमवून द्यायचे खरे कौशल्य हे अभिनेत्यांचे असते.”