खाऊ मिळेल का खाऊ?

    19-Dec-2023   
Total Views |
MVA Protest Against Adani In Dharavi Redevelopment Project

एक डाव भुताचा तसा एक वाटा कुणाचा हे सगळ्या मुंबईकरांना माहिती आहे. मुंबईमधली प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक पायाभूत सुविधांचा विकास पुनर्निर्माण होत असताना वाटा द्यावाच लागतो. मग आता कसं काय बदलणार? त्यामुळे धारावीत मोर्चा काढला. धारावीचा पुनर्विकास करताना सगळ्या पात्र अपात्रांना देऊन टाका घर अशी मागणी आहे. काय म्हणता, ते फेसबुक लाईव्ह करण्यााइतक सोप नाही? काय म्हणता, धारावीचा मोर्चा कधीपर्यंत ताणणार? ते काय माझ्या हातात आहे. लहान मुल दंगा करत असेल तर कसं शांत बसतं? त्याला त्याचा वाटा नसेल तरी खाऊ द्यावा लागतो. इतकं सोपं आहे ते. धारावीचा पुनर्विकास विकास अदानी करणार तर मग आम्ही कुठे गेलो होतो का? कोरोना काळात जे घरी बसलो ते घरीच आहोत. आम्ही कोण म्हणून पुसतोस? जा विचारून ये ज्याच्यावर घरी बसून राज्य केले त्या सगळ्या महाराष्ट्राला. काय म्हणता, राज्य केले आणि नको नकोसे केले? काहीही म्हणा पण काय ते दिवस होते. पण आता हा एवढा मोठा कारभार होणार आहे आमच्या डोळ्यादेखत. इतकी वर्षे आस लावून होतो. तिथे आम्ही नाही? अस कस चालेल? आमच्या सत्ताकाळात धारावीचा पुनर्विकास झाला असता आणि अदानींनी तो केला असता तर? आम्ही पण आमचा विकासच विकास करू शकत होतो. हो, आमचाचा विकास. कारण आमचा विकास म्हणजे मुंबईचा विकास, आमचा विकास म्हणजे मराठी माणसाचा विकास. आमचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास. धारावी पुनर्विकास आमच्याशिवाय होणे शक्यच नाही. ती म्हण का उगीच आहे की ‘लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.’ काय म्हणता आम्ही कुणाला पोसतो? हे असले फालतू प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारून महाराष्ट्रद्रोह करू नका. आम्हाला उत्तर द्यायची सवय नाही. हे बघा कमळवाल्यांचे कौतुक सांगू नका. त्या कमळवाल्यांकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असेल. पण माझ्याकडे प्रत्येक उत्तराचा प्रश्न आहे. आमच्या वर्तमानपत्रातही आम्ही स्वत:च प्रश्न निवडतो. स्वतःच तो विचारायला लावतो आणि स्वतःच त्याची उत्तर देतो. इथे प्रश्नही आमचीच आणि उत्तरही आमचीच कळलं का? तर मुद्द्यावर येऊ. जीवन खूप सुंदर आहे पण अमुकतमुक असतं तर असे जे वाक्य आहे ना तसच आणखी एक वाक्य आहे. पुनर्विकास खूप सुंदर आहे. पण खाऊच काय? अदानी भाऊ! खाऊ खाऊ! बाळ रडतय.. खाऊ मिळेल का खाऊ.
 
कोण बनेल राज्यकर्ता?

सध्या मविआचे धुरंधर कोण याबद्दल रणकंदन सुरू होते. त्याच काळात त्यांच्या कन्येला संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, संसरदरत्न सुप्रिया सुळे यांना संसदेतून निलंबित करण्यात आले. लेकीचा उल्लेख संसदरत्न करताना पवारांनी लेकीचे संसदेमधले कर्तृत्व सांगितले असते तर बरे झाले असते. मटण खाऊन देवळात जाणारे किंवा मंदिरात पूर्ण पोषाख घालणे अनिवार्य केले म्हणून दुःखी होणारे त्यांचे कन्यारत्न सुप्रिया सुळे. ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा?’ या एका वाक्यामुळे त्यांचेे कन्यारत्न अजरामर झाले आहे, तर अशा सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्राच्या राजकारणात बस्तान बसावे म्हणून शरद पवार आकाश पाताळ एक करत आहेत. आयुष्यभर राजकीय कारकिर्दीत साथसंगत करणार्‍या पुतण्यालाही पुत्रीमोहासाठी क्षणात कात्रजचा घाट दाखवण्याचीही तयारी, रंगीत तालीम त्यांनी अनेकदा केली होती. इतिहास साक्षी आहे. काका मला वाचवा म्हणणारा भूतकाळातला तो पुतण्या कटाचा बळी ठरला. पण आता पुतण्याने काकाची वाट पाहिली आणि ती वाटच संपवून टाकली. पुतण्यासोबत हे का? तर वारसदार सुप्रिया सुळेंसाठी. त्यामुळेच मी म्हातारा नाही अजूनही काही लोकांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे असे जेव्हा शरद पवार म्हणतात, तेव्हा त्याला अनेक आयाम आणि अनेक लक्ष्य असतात. मात्र हेसुद्धा खरेच आहे शरद पवारांसारखी प्रवृत्ती म्हातारी होत नसते. (कोणती प्रवृत्ती विचारू नका)पण समाज तर बदलत असतो. असो पूर्वीही समाजमाध्यम नसताना काही ठरावीक लोक त्यांच्याबद्दल वृत्तपत्रात भरभरून लिहीतच असायची. आता काळ बदलला आणि शरद पवार यांची वेळही बदलली. नव्या युगात माध्यमामध्ये शरद पवार यांचेच नाव चर्चेत असते. पण त्या चर्चांचा विषय पाहून वाटते की, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे सगळे पाहत असतील का? पित्याने लेकीला संसदरत्न म्हणायचे आणि लेकीने पित्याला जाणताराजा म्हणायचे आणि दोघांचे म्हणणे म्हणजे समाजाचे म्हणणे असे दोघांनी मिळून सांगायचे हे दिवस गेले. तसेही आता घराणेशाहीचा वारसदार नाही, तर लोकांचा सेवकच राज्यकर्ता बनेल.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.