रमेश यांच्या कर्तृत्वाचे भवरीसह भिलोरेलाही वैभव

    19-Dec-2023   
Total Views |
 Article on Bhavari Collection Owner Ramesh Bhilore

निर्धार पक्का केला, तर मराठी माणूसही व्यवसायामध्ये उत्तुंग यश, नावलौकिक मिळवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भवरी कलेक्शनचे सर्वेसर्वा रमेश लक्ष्मण भिलोरे. लहानपणापासून कष्टाची कामे केली. मात्र, सगळीकडून मदतीचे मार्ग बंद झाल्यानंतर त्यांनी जमीन विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच निर्णयातून आज ५० हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. जाणून घेऊया त्यांची खडतर, परंतु तितकीच प्रेरणादायी अशी यशोगाथा......

१९६५ साली नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील भवरी गावात जन्मलेल्या रमेश लक्ष्मण भिलोरे यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. भोळसर स्वभावाचे वडील दिवसभर लोकांची मिळेल ती कामे करत, त्या मोबदल्यात मिळालेला भाकर-तुकडा घरी येऊन येत. आई द्रौपदाबाईने शेतात निंदणी-खुरपणी करण्यासह गावाच्या वेशीबाहेरील आडातून लोकांना पाणी आणून देण्यासारखी अनेक कष्टप्रद कामे केली. मोठा भाऊ अशोक शाळेतून आल्यानंतर मोटेने पाणी भरायचा. गरिबीमुळे हतबल झाल्यानंतर तो १९७०च्यादरम्यान कामाच्या शोधात नाशिकरोडला आला आणि शंकर बन्सीलाल राठी यांच्याकडे २५० रुपये महिना पगारावर नोकरी करू लागला. किराणा दुकानात काम करण्यासह तो कावडीने पाणी भरत असे. अशोकने विष्णुनगर येथे भाड्याने एक खोली घेतली आणि संपूर्ण कुटुंबालाही नाशिकरोडला आणले. आईदेखील धुणी-भांड्याची कामे करू लागली.

रमेश जवळच्याच नगरपालिकेच्या शाळेत जाऊ लागले. सकाळी शाळेत जायचे, तर दुपारी काकड्यांसहित घरून पाववडे, चहा बनवून त्याची रेल्वे स्थानकावर विक्री करायची, असा दिनक्रम होता. त्यातून मिळालेले पैसे ते घरखर्चासाठी देत असत. पुढे त्यांचा भाऊ माल धक्का येथे माथाडी कामगार म्हणून काम करू लागला. रमेश यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर नाशिकरोड ते देवळाली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाडीत पाववड्याची विक्री करू लागले. १९८० च्या आसपास तेव्हा एका पाववड्याची किंमत १५ पैसे इतकी होती. एकदा रेल्वे स्थानकावर ग्राहकाला पाववडा दिला आणि तेवढ्यात रेल्वेगाडीने वेग पकडला. एक हात निसटला आणि काही अंतर रमेश घसरत गेले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले, पण कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा रेल्वे स्थानकात जाऊन व्यवसाय न करण्याची तंबी दिली. त्यानंतर त्यांनी नाशिकरोड परिसरातील ताराचंदशेठ थावरानी यांच्या रंजना क्लॉथ स्टोअर्स या कपड्याच्या दुकानात २५० रुपये महिना पगारावर नोकरी सुरू केली. १९९० च्या दरम्यान हे दुकान बंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी नोकरी सोडली. पुढे मोहन एम्पोरियम आणि महावीर कलेक्शन या कापड दुकानांमध्ये त्यांनी २०१२ पर्यंत काम केले. दुकानमालकाच्या सहकार्याने त्यांना व्यवसायातील अनेक नवनवीन गोष्टी शिकता आल्या.

माल आणण्यासाठी ठिकठिकाणी त्यांचे जाणे होत असल्याने त्यांना कापड व्यवसायाचा संपूर्ण अनुभव आला. २०१२ नंतर पुढे अनेकांनी त्यांना स्वतःचा कापड व्यवसाय टाकण्याचा सल्ला दिला. त्यावर रमेश यांनी पुन्हा गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला. मात्र, कोरडवाहू शेतजमिनीतून किती उत्पन्न निघेल, याची शाश्वती नव्हती. कापड दुकान सुरू करण्याठी हाती तेवढा पैसा हवा, जो रमेश यांच्याकडे नव्हता. बँकेत साठवलेल्या लाखभर रुपयांमध्ये गाळा घेणे शक्य नव्हते. त्या पैशांत त्यांनी सुरुवातीला गाळा बुकिंग करून ठेवला, जो वर्षभरानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर ताब्यात मिळणार होता. गाळ्यासाठी लागणारे १६ लाख रुपये आणायचे कुठून असा प्रश्न रमेश यांच्यासमोर होता. कापड व्यवसायातील संपूर्ण ज्ञान, अनुभव असूनही केवळ पैसा नाही म्हणून त्यांचे व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अधांतरी राहते की काय, अशी स्थिती होती. यात आप्तेष्ठांनी संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा बिल्डरला पैसे देण्याची वेळ आली, तेव्हा मदत काही मिळाली नाही. शेवटी नाईलाज म्हणून त्यांनी गावाकडील एक एकर शेतजमीन विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी गाळा विकत घेतला आणि त्यांचे कापड दुकान सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

तब्बल ३० ते ३५ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने रमेश यांचा ग्राहकांशी चांगला परिचय होता. दुकान सुरू होण्यापूर्वी शहरातील बाजारामध्ये एक महिना ते सायकलवर जुन्या ग्राहकांना शोधून नव्या दुकानाविषयी माहिती देत असत. दुकान सुरू झाल्यानंतर माल घेतानाही त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अनंत अडचणींवर मात करून त्यांनी भवरी कलेक्शन या नावाने कापड व्यवसायाला सुरुवात केली. मुलाचे स्वप्न पूर्ण होऊन एक वर्ष झाल्यानंतर लगेचच २०१३ साली त्यांच्या आईचेही निधन झाले.

रमेश यांना व्यवसायामध्ये मुलगा राहुल याचे प्रचंड सहकार्य मिळते. त्याचबरोबर मुलगी मनीषा, पत्नी शोभा, भाचे, पुतण्या यांचीही मदत होते. भवरी कलेक्शनमध्ये साड्या, पातळे, धोतरं, सतरंजी, चादर, बेडशीट अशा कापडाच्या सर्व गोष्टी मिळतात. एका छोट्याशा गाळ्यातून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या भव्य शोरूमपर्यंत येऊन ठेपला आहे. लवकरच भवरी कलेक्शनचे भव्य दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहेत.

वेळप्रसंगी पाववडा, काकडी विकून रमेश यांनी घरखर्चाला हातभार लावला. कापड दुकानात काम करून अनुभव घेतला. सगळीकडून मदतीचे मार्ग बंद झाले असताना जमीन विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच निर्णयातून आज ५०हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी प्राप्त झाली. निर्धार पक्का केला, तर मराठी माणूनदेखील व्यवसायामध्ये उत्तुंग यश आणि नावलौकिक मिळवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भवरी कलेक्शनचे सर्वेसर्वा रमेश लक्ष्मण भिलोरे. गरिबीसह अनंत अडचणींवर मात करून नवउद्योजकांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या रमेश भिलोरे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...

ग्राहकांकडूनच होते जाहिरात

महाराष्ट्रासह अहमदाबाद, पाली, राजस्थान, सुरत, महू, मदुराई, वाराणसी, मुंबई, सोलापूर, अमृतसर अशा अनेक ठिकाणांहून भवरी कलेक्शनमध्ये कपड्यांचा माल येतो. अगदी किरकोळ ते होलसेलपर्यंतच्या खरेदीसाठी ग्राहक दुकानात गर्दी करतात. लोकांना ठिकठिकाणी जाहिरात करावी लागते. मोठमोठे बॅनर लावावे लागतात. मात्र, रमेश यांच्या जुन्या ग्राहकांनीच त्यांची व त्यांच्या भवरी कलेक्शनची जाहिरात केली. आताही त्यांचे ग्राहकच त्यांची जाहिरात करतात.

५० ते ६० महिलांना रोजगार

सोनांबे, कोनांबे, धामणी, शरदवाडी, उद्योग भवन सिन्नर, दोडी दापूर, हिसवळ, मनमाड, लोणवाडी, लाखलगाव,मालेगाव, उगाव, वडाळीभोई अशा जवळपास ५० ते ६० गावांमधील अनेक महिला भवरी कलेक्शनसोबत रोजगाराच्या निमित्ताने जोडल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागातील हलाखीची परिस्थिती असलेल्या महिला भवरी कलेक्शनमधील माल होलसेलमधून घेऊन त्याची आपापल्या गावांत विक्री करतात. त्यामुळे सध्या भवरी कलेक्शनच्या माध्यमातून विविध गावांतील ५० ते ६० महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.

शहरात येऊनही मातीशी नाळ घट्ट

दुकान सुरू केल्यानंतर अनेकजण आपल्या मुला-मुलींची नावे दुकानाला देतात. तसेच, कुणी राजस्थान भेळ सेंटर, हरियाणा भेळ सेंटर अशी नावे दुकानाला देतात. मात्र, माणसाचे मूळ माणसाला सोडता येत नाही. अनेकजण परराज्यातून येऊनही त्यांच्या राज्याची, शहराची नावे दुकानाला देतात. त्यामुळे मी नांदगाव तालुक्यातील भवरी गावी जन्मल्याने त्याच गावाचे नाव दुकानाला दिले असल्याचे रमेश भिलोरे सांगतात. शहरात येऊनही रमेश यांनी आपल्या गावच्या मातीशी असलेली नाळ सोडली नाही.

आध्यात्मिक कार्यक्रमात योगदान

भवरी कलेक्शनमध्ये सध्या ११ कर्मचारी नोकरी करतात. विशेष म्हणजे, या सर्वांना कुठली अडचण निर्माण होऊ नये या उद्देशाने त्यांनी सर्वांच्या ‘मेडिक्लेम पॉलिसी’ काढलेल्या आहेत. आध्यात्मिक कार्यक्रम कुठेही असो, त्यात त्यांचे योगदान असते. परमार्थिक क्षेत्राची त्यांना आवड असून बालपणी भजनीमंडळातही त्यांचा सहभाग होता. अध्यात्मासह त्यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे. कुठलेही काम नितिमत्ता चांगली ठेवून करावे. मनात निर्धार ठेवून कधीही माघार घ्यायची नाही. प्रयत्न करत राहिले, तर नक्की यश मिळते. मी कधीही माघार घेतली नाही. ग्राहकाने खरेदी नाही केली तरी त्याच्यावर नाराज होऊ नये, असेही रमेश सांगतात.

(अधिक माहितीसाठी संपर्क ः ७०५८५८९७६७)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.