व्यावसायिक नाटकांच्या अनुदानात दुप्पट वाढ करा - निरंजन डावखरे
18-Dec-2023
Total Views |
नागपूर : राज्य सरकारकडून व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणारे प्रलंबित अनुदान अदा करण्याबरोबरच नाटकांच्या अनुदानाच्या रकमेत दुप्पट वाढ करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. या बाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी दिले.
जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार निरंजन डावखरे यांना नाटकांचे अनुदान रखडल्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात डावखरे यांनी नागपूर विधानभवनात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक व साहित्यिक परंपरा असलेल्या मराठी नाटकांच्या निर्मात्यांना अर्थसाह्य म्हणून राज्य सरकारतर्फे व्यावसायिक नाटकांसाठी अ वर्गासाठी प्रती प्रयोग २५ हजार रुपये व ब वर्गासाठी २० हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यानुसार मी स्वरा आणि ते दोघे, हीच तर फॅमिलीची गंमत आहे, संज्या छाया, ३८ कृष्णव्हिला, खरं खरं सांग, प्रेम करावं जपून, कुर्रर्रर्र, परफेक्ट मर्डर आदींसह काही नाटकांच्या फाईल्स अनुदानासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, या नाटकांसाठी अनुदान मिळालेले नाही’, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
सध्या मराठी नाटक उभारण्यासाठीच्या खर्चात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनुदानाची रक्कम अ वर्गासाठी प्रती प्रयोग ५० हजार रुपये व ब वर्गासाठी प्रती प्रयोग ३० हजार रुपये करण्याची निर्मात्यांकडून मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर बालनाट्यांसाठी प्रती प्रयोग ३० हजार रुपये अनुदान करण्याची विनंती करण्यात येत आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यावर तातडीन कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.