नागपूर : राज्यात सध्या सलीम कुत्ता प्रकरण चांगलेच तापले असून विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. सोमवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून जोरदार खडजंगी पहायला मिळाली. भाजप आमदार नितेश राणे यांनी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताच्या पार्टीत उबाठा गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर सहभागी झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
सोमवारी सभागृहात विरोधी पक्षातील सदस्यांनी दाऊद इब्राहिमच्या नातेवाईंकाच्या लग्नात गिरीष महाजन उपस्थित झाले असल्याचा आरोप केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि उबाठा गटाचे अनिल परब यांनी हा आरोप केला.
अंबादास दानवे यांनी भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांचे सभागृहात नाव घेतल्याने विधानपरिषद अध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी त्यांना खडेबोल सुनावले. नवाब मलिकांचा वचपा काढण्यासाठी तुम्ही राजकारण करत आहात. तसेच अंबादास दानवे उद्धव ठाकरेंसमोर इम्प्रेशन पाडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनिल परब, भाई जगताप आणि विलास पोतनिस हे कामामध्ये गोंधळ घालत असल्याने त्यांना जाग्यावर जाऊन बसण्यास सांगितले. २८९ फेटाळून १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले.
त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, एकनाथ खडसे आणि अनिल परब हे तिघेही २८९ अंतर्गत एकच विषय मांडत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांचे नाव घ्यायचे असल्यास त्याबद्दलची नोटीस द्यावी लागते. परंतू, नोटीस न देता ते वारंवार नाव घेत आहेत. त्यामुळे ही अनावश्यक चर्चा कामकाजातून काढून टाकण्याची विनंतीही दरेकर यांनी केली आहे. उद्धव ठाकरे सभागृहात आल्याने आज त्यांच्या अंगात आलं आहे असा घणाघातही त्यांनी केला.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, "एखाद्या लग्न समारंभाचे फोटो दाखवून मंत्र्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. बऱ्याच दिवसांनंतर त्यांच्या पक्षाचे नेते सभागृहात आल्याने आपण कसं कामकाज करतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. याप्रकरणी आधीच एसआयटी चौकशी सुरु झाली आहे. त्यातून सगळ्या गोष्टी पुढे येईल. काही फोटो हे लग्नाला जाऊन शुभाशिर्वाद देणारे आहेत तर काहींचे फोटो हे लग्नानंतर झालेल्या मद्यप्राशन करून नाचगाणे करणाऱ्या पार्टीचे आहेत. त्यामुळे ज्याचे दाऊदशी संबंध आहेत त्यांची एसआयटी चौकशी होईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.