मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर औरंग्याने जी मशीद उभारली होती, तिचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला. काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल येण्यापूर्वीच, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सर्वेक्षणाला न्यायालयाने परवानगी दिली. पुढील महिन्यात श्रीराम जन्मभूमीवरील भव्यदिव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असतानाच, न्यायालयाने दिलेला हा निकाल निव्वळ योगायोग नाहीच!
मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण केले जाणार असून, ही मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. म्हणूनच मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात यावे, यासाठीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली गेली होती. न्यायालयाने वैज्ञानिक सर्वेक्षणास परवानगी दिली. त्यापूर्वी मथुरा न्यायालयाने ती तशी दिलीही होती. म्हणूनच मुस्लीम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत, वैज्ञानिक सर्वेक्षण रोखलेले नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यापूर्वीच काशी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करत असून, पुढील आठवड्यात त्याचा अहवाल येणे अपेक्षित आहे. भगवान श्रीकृष्ण विराजमान तसेच अन्य सात जणांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. मुघल शासक औरंगजेब याच्या आदेशावरून, १६७० मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीवरच ही मशीद बांधली असल्याचे म्हटले आहे. १३ एकरपेक्षा जास्त जागेवर उभी करण्यात आलेली, ही मशीद हटवण्यात यावी, अशीही मागणी आहे.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बाबराने अशाच पद्धतीने आक्रमण करत, अनधिकृत ढाँचा उभारला होता. कित्येक दशके न्यायालयात लढा दिल्यानंतर तसेच संघ परिवाराने यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतल्यानंतर, अखेर १९९०च्या दशकात बाबरी ढाँचा लाखो कारसेवकांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनात जमीनदोस्त करण्यात आला. श्रीराम जन्मभूमीचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतरच, तेथे श्रीराम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला. ‘अयोध्या तो झांकी हैं, काशी-मथुरा बाकी हैं’ या १९९० मधील घोषणेचे या निमित्ताने स्मरण होते. काशी येथील अहवाल ही केवळ औपचारिकता आहे. ‘बाबा मिल गये’ हे सर्वेक्षणादरम्यान समोर आले. तिथेही सर्वेक्षणाच्या अहवालातून ऐतिहासिक सत्य, अयोध्येप्रमाणे समोर येईलच.
मथुरेतही फारसे वेगळे चित्र नाही. श्रीकृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या मशिदीत हिंदू चिन्हे, प्रतीके अगदी जागोजागी आढळतात. कलश, कमळ यांच्यासह येथे हिंदूंचे मंदिरच होते, हे सांगणार्या खुणा विखुरलेल्या आहेत. शेषनागाने श्रीकृष्णाचा जन्म झाला, तेव्हा त्यांचे अन्यायी कंसापासून रक्षण केले, असे मानले जाते. त्या शेषनागाची प्रतिमा येथे आहे. मथुरा ही श्रीकृष्ण जन्मभूमी, ही हिंदूंची श्रद्धा आहेच, पण ते ऐतिहासिक सत्यही आहे. मथुरा, गोकुळ, वृंदावन या तिन्ही स्थानांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व. दुर्दैवाने भारतात बहुसंख्य हिंदूंना पुरावा सादर केल्याशिवाय त्यांचा हक्क मिळत नाही, असे इतिहास सांगतो. मथुरेतील श्रीकृष्णाचे जन्मस्थान औरंग्याने मशीद उभारून, त्याखाली दडवले, हे दिसत असूनही ते हिंदूंना सिद्ध करावे लागणार आहे.
अब्राहमिक धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धर्मग्रंथांतील पावित्र्य अधोरेखित करण्यासाठी पुरावे देण्यास सांगणे, हा तर चक्क धर्मद्रोह मानला जातो. तसेच त्यांच्या श्रद्धास्थानाचा जन्म कोठे झाला किंवा जेथे त्यांची प्रार्थनास्थळे उभारली गेली आहेत, त्याठिकाणीच तो झाला का? असा प्रश्न विचारणे म्हणजे मोठा गुन्हा ठरतो. असा प्रश्न विचारण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याच्यावर नेमकी कोणती प्राणघातक परिस्थिती ओढवेल, हे सांगता येत नाही. दुसरीकडे हिंदूंना मात्र अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे न्यायालयात सिद्ध करण्यासाठी कित्येक दशकांचा कालावधी जावा लागला. जे ऐतिहासिक सत्य आहे, डोळ्यांना स्पष्टपणे दिसत होते, ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रदीर्घ असा लढा द्यावा लागला.
त्याच धर्तीवर श्रीकृष्ण जन्मभूमी स्थानावरील मशिदीसह एकूण १३.३७ एकर जमिनीचा ताबा मंदिर व्यवस्थापनाला मिळावा, यासाठी मथुरा येथील विविध न्यायालयांमध्ये ज्या १८ स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यांची आता एकत्रित सुनावणी होणार आहे. कमळाच्या आकारातील स्तंभ तसेच शेषनागाची असलेली प्रतिमा मशीद हे मंदिरच आहे, यावर शिक्कामोर्तब करणार आहे. औरंगजेबाने देशभरातील हिंदू धार्मिक स्थळे, तसेच मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. त्याचाच भाग म्हणून मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थानावर मशीद उभारली गेली. श्री केशव देव मंदिर अंशतः पाडून, तेथे एक बांधकाम उभे करण्यात आले. त्यालाच औरंगजेबाने ‘मशीद’ असे संबोधले. औरंगजेबाने मंदिरे उद्ध्वस्त करण्यासाठी १६७०च्या जानेवारी-फेब्रुवारीत जो आदेश दिला होता, तो आजही उपलब्ध आहे.
मशीद उभारण्यापूर्वी याच जागेवर राजा वीरसिंग बुंदेला यांनी १६१८ मध्ये मंदिर बांधले होते, असा उल्लेख आढळतो. याच मंदिराच्या जागेवर १६७० मध्ये मशीद उभारली गेली. १८१५ मध्ये त्याची मालकी ईस्ट इंडिया कंपनीकडून राजा पटनी याच्याकडे आली. त्याने १३.७७ एकर जागा विकत घेतली. त्याचे वंशज राय किशन दास तसेच राय आनंद दास यांनी ती जुगल किशोर बिर्ला यांना विकली. त्यानंतर ती पंडित मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त तसेच भिकेन लालजी आत्रे यांच्या नावावर नोंदवली गेली. ‘श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट’ची स्थापना बिर्ला यांनी केली होती. १९५१ मध्ये १३.७७ एकर जमीन ट्रस्टच्या नावावर ठेवली गेली. १९५६ मध्ये मंदिराचा कारभार पाहण्यासाठी, ‘श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघा’ची स्थापना करण्यात आली. १९७७ मध्ये ‘संघ’ हा शब्द बदलून, तो ‘संस्थान’ असा करण्यात आला.
मथुरा हे यमुना नदीवर वसलेले शहर. १०१७-१८ मध्ये गझनीच्या महमूदने या शहराला लुटले होते, अशीही नोंद इतिहासात आढळते. १५०० ते १७५७ या काळात चार वेळा या शहरावर हल्ला करण्यात आला. १८०४ मध्ये ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले. हिंदूंच्या सात पवित्र शहरांपैकी ते एक. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लाखो भाविक देश-विदेशातून येथे हा उत्सव साजरा करण्यासाठी येतात. मथुरा शहराचा सुमारे २५०० वर्षांपूर्वीपर्यंतचा इतिहास मिळतो. याचा ऐतिहासिक तसेच पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळतो. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या वर्णनातही मोदोरो नावाच्या एका शहराला उल्लेख आहे, ज्याचा अर्थ ‘देवांचे शहर’ असा होतो. मथुरेच्या जवळच ‘गोकुळ’ आहे, वृंदावन आहे, तसेच गोवर्धन पर्वतही आहे.
श्रीराम मंदिराचे लोकार्पण जानेवारी महिन्यात होत असतानाच, श्रीकृष्ण जन्मभूमीचा विषय न्यायालयीन पटलावर येणे, हा निव्वळ योगायोग नाही. त्यासाठी हिंदूंनी कित्येक वर्षे संघर्ष केला आहे. अयोध्या, काशी, मथुरा ही धर्मस्थळे हिंदूंची मानबिंदू, म्हणूनच त्यांच्यावर आक्रमणकर्त्यांनी घाला घातला. एखाद्याचा धर्म, धार्मिक प्रतीके उद्ध्वस्त केली की, त्याच्या धर्माची प्रेरणा, अस्तित्व यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. समाजाची लढाऊ वृत्ती हरवते. एकेश्वरवादी इस्लामला अन्य धर्मांचे अस्तित्वच मान्य नाही. म्हणूनच त्यांनी विशेषतः या तिन्ही ठिकाणी मशिदी उभारल्या. हे ऐतिहासिक सत्य मुस्लिमांना मान्यच नाही. म्हणूनच मशिदीवरील आपला हक्क ते सोडत नाहीत. हिंदूंनी आजवर जो कायदेशीर लढा दिला आहे, त्याची गोमटी फळे त्यांना मिळत आहेत. हिंदूंनी संयम बाळगला, न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम ठेवला. अनेक दशके आपल्या धर्मस्थळांसाठी त्यांनी संघर्ष केला आणि आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळस चढवला आहे, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही.