जगातील पहिल्या फ्युजन वारली कलाकार

    15-Dec-2023   
Total Views |
Article on Hema Thakur

चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना, जगातील पहिल्या फ्युजन वारली कलाकार होण्याचा नावलौकिक कमावलेल्या नाशिक जिल्ह्यातील हेमा विजयकुमार ठाकूर यांच्याविषयी...
 
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेड गावात १९७० साली हेमा विजयकुमार ठाकूर यांचा जन्म झाला. डी. एल. हिंदी हायस्कूलमध्ये त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय वयात त्यांना रांगोळी काढण्याचा छंद होता. हेमा यांचे हस्ताक्षरही सुरेख व रेखीव. ‘हेमाचे अक्षर जसे मोती टिपलेले आहेत,’ अशा शब्दांत त्यांच्या हस्ताक्षराचे शाळेत कौतुक होत असे. फावल्या वेळेत त्या साध्या पेन्सिलने पक्ष्यांची व मिळेल त्या विषयाची चित्रे काढत आणि त्याला शेडिंग करत. परिसरात कुठेही कुणाची रांगोळी चुकली वा खराब झाली, तर त्यावेळी ती रांगोळी सावरण्यासाठी त्यांना बोलावले जात असे. दिवाळीत तर अगदी रात्री १० वाजेपर्यंत त्या रांगोळ्या काढत बसत. विज्ञान हॉलमध्येही त्यांच्या आकृत्या, चित्रे लावली जात असे.

हेमा यांच्या दोन्ही काकांचे हृदयविकाराने निधन झाले होते. वडिलांनाही हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे इयत्ता दहावीचा निकाल येण्याआधीच, त्यांचा मुंबई येथील अभियंता विजयकुमार ठाकूर यांच्याशी विवाह झाला. लग्न झाल्यानंतर पाच ते सहा वर्षांनंतर त्यांनी मुक्त विद्यापीठातून इयत्ता बारावीचे शिक्षण घेतले. त्यावेळी मुक्त विद्यापीठाच्या एचपीटी कॉलेज या केंद्रात तेथील प्राचार्य आणि शिक्षकांनी हेमा यांना त्यांच्या पतीला महाविद्यालयामध्ये बोलविण्यास सांगितले. पती महाविद्यालयामध्ये आल्यानंतर त्यावेळी सर्वांनी ‘मुक्त विद्यापीठ सुरू झाल्यापासून इतकं सुंदर लिहिणारी, मुलगी आम्ही पहिल्यांदा पाहिली असून, ही मुलगी जगामध्ये नाव करेल, तिला घरात बसवू नका, तिच्या हातात ब्रश द्या’ अशा शब्दांत सर्वांनी हेमा यांचे कौतुक केले.

२००१ साली त्या नाशिकला स्थायिक झाल्या. त्यानंतर रांगोळ्या काढण्याचा छंद त्यांनी जोपासला. या दरम्यान त्यांची मुलगी अर्पिता इंग्लंडमध्ये शिक्षणानिमित्ताने वास्तव्यास होती. तेव्हा तिने आपल्या आईला आणि तिच्या कलेला पुढे आणण्याचा निश्चय केला. पुण्यातील वैशाली हॉटेलच्या संचालकांशी ओळख झाली, त्यानंतर त्यांनी हेमा यांना सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवायला बोलावले. त्याचवेळी हॉटेलसाठी एक चित्र रेखाटून देण्याची विनंती केली. त्यानंतर हेमा यांनी संचालकांच्या वाढदिवशी आठ फूट बाय चार फुटांचे वारली चित्र भेट दिले. जे वैशाली हॉटेलमध्ये लावले गेले. एकदा एका शाळेच्या मुख्याध्यापिकेचे कॅलिफोर्नियात प्रदर्शन होते. त्यावेळी हेमा यांच्या मुलीने यासाठी त्या मुख्याध्यापिकेला आपल्या आईच्या कलेविषयी माहिती दिली.

पण, त्यावेळी जागा भरल्याने नंतर २०१६ साली न्यूयॉर्क येथील प्रदर्शनासाठी हेमा यांनी चित्रे पाठवली, त्यांच्या चित्रांची निवडही झाली. २ हजार, ७०० वैयक्तिक कलाकारांतून सात विशेष कलाकारांमध्ये त्यांची निवड झाली व ‘युनिक कलाकार’ म्हणून हेमा यांचा सन्मान करण्यात आला.नंतर ’आर्ट टूर इंटरनॅशनल’ या जागतिक कलाकारांच्या न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणार्‍या मासिकाने २०१६-१७ करिता उत्कृष्ट कलाकारांच्या पुरस्कारासाठी जगातील ६० कलाकारांचे नामांकन केले, त्यात हेमा यांचा समावेश करण्यात आला. पुढे या ६० पैकी १६ जणांची निवड झाली. या ‘अंतिम १६’मध्ये हेमा यांनी जगातील उत्कृष्ट कलाकार म्हणून सहावा क्रमांक पटकावला, जो त्यांना इटली येथील फ्लोरेन्स शहरात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सध्या त्यांची तीन चित्रे न्यूयॉर्कमधील आर्ट गॅलरीत आहे. परदेशात हेमा यांच्या कलेचे प्रचंड कौतुक झाले आणि भारतातही त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित केले गेले.

वारली कलेच्या केवळ एक दिवसीय कार्यशाळेत त्या सहभागी झाल्या होत्या. तिथून त्यांनी काही नवीन करण्याच्या उद्देशाने आधुनिक पद्धतीने वारली कला जोपासण्यास सुरुवात केली. अगदी बास्केटबॉल खेळतानाचे खेळाडू, समुद्रकिनारी बसलेल्या मैत्रिणी, योग करताना, कट्ट्यावर बसून गप्पा मारताना मित्रमंडळी अशा अनेक थीमवर त्यांनी फ्युजन वारली चित्रे रेखाटली आहेत. वारली कला ही भिंतीवर, ब्राऊन पेपरवर साकारली जाते. मात्र, हेमा यांनी त्याला आधुनिक पद्धतीची झालर देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळातील ‘लॉकडाऊन’मध्ये त्यांनी ‘प्लॅनेट युनिव्हर्स आर्ट’ अर्थात ‘विविध ग्रहांची चित्रे’ काढण्यास सुरुवात केली. पती विजयकुमार, मुलगी अर्पिता, मुलगा वैभव यांसह पतीचे मित्र पार्थसारथी बॅनर्जी, दीपक जगताप आणि मीना जगताप यांनी हेमा यांना नेहमीच सहकार्य केले. आतापर्यंत हेमा यांच्या चित्रांचे २५ ते ३० प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या कलेचे कौतुक केले. “कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य हवे. ध्यानधारणेने आपल्यातील कला ओळखता येतात,” असे हेमा सांगतात.

संपूर्ण जगात फ्युजन वारली कलाप्रकारात कला जोपासणार्‍या, हेमा ठाकूर या जगातील पहिल्या कलाकार आहे. चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसतानाही, फ्युजन वारली कलेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणार्‍या, हेमा विजयकुमार ठाकुर यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क ः ७८७५८०७७७०)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.