घाबरले नाहीत? एक अफवा

    14-Dec-2023   
Total Views |
rahul gandhi
 
अराजकवादी दि. १३ डिसेंबर रोजी संसदेत घुसले. तेव्हा राहुल गांधी काय करत होते, याबाबत काँग्रेसी नेता सुप्रिया श्रीनेत यांनी एक्स आणि ट्विटरवर पोस्ट टाकली. त्यांनी राहुल गांधींच्या फोटोसोबत लिहिले की,”डरो मत। कहते ही नहीं, बल्कि करके भी दिखाते हैं। जब संसद में हंगामा हुआ, तब सीना फुलाकर खड़े थे नेता।” यावर नतद्रष्टांनीही मतं व्यक्त केली. त्यांचे म्हणणे की, राहुल गांधी तिथे पुतळ्यासारखे उभे होते. कारण, काय घडले, चालले काय आहे, याचा उलगडा होण्याइतकी समज त्यांच्यात असेल का? निर्भय नाही तर निबुद्धपणे, हतबद्धपणे ते उभे होते. काही लोकांचे म्हणणे की, संसदेत ते दोघे आले, त्यावेळी सगळ्यांना क्षणभर कळले नाही की काय झाले? क्षणात वाटलेही असेल की, ३३ वर्षांपूर्वी दि. १३ डिसेंबर रोजी संसदेवर हल्ला झाला होता, तसा तर हल्ला झाला नाही ना? एकच क्षण जीवन-मरण सगळ्यांनाच आठवले असेल. मात्र, त्या एका क्षणानंतर खासदार सजग झाले आणि त्यांनीही त्या घुसखोराला पकडले. त्याला यथेच्छ चोप दिला.
 
या सगळ्या धुमश्चक्रीत राहुल गांधी काय करत होते? दूर उभे राहून ताठ छातीने सगळे पाहत होते? तो काय तमाशा होता? जे काय चालले, त्याच्याशी आपले काही देणेघेणे नाही, असे ते उभे होते! तर काही लोकांचे म्हणणे आहे की, मौज चालली आहे, बघूया आणि यावरून भारतीय जनता पक्ष मुख्यतः नरेंद्र मोदी यांना कसे लक्ष करता येईल, याचे गणित राहुल गांधी कदाचित मनात मांडत असतील.
 
यावरही टिप्पणी करणारे म्हणतात की, राहुल गांधी यांच्या मते, स्वतः विचार करण्याची त्यांची क्षमता आहे का, यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे संसदेत जे काही घडले त्यावर काय करावे, हा विचार ते करूच शकत नाहीत. या सगळ्या मतमतांतरांमध्ये काही नतद्रष्ट तर असाही विचार करत आहेत की, संसदेत असे काही केले की, जगभर प्रसिद्ध मिळेल, यासाठी ते घुसखोर संसदेत घुसले. त्यांच्यामुळे जीवाला धोका नाही, हे ज्या व्यक्तीला माहिती असेल, तोच असा गंमत बघितल्यासारखा तिथे उभा राहू शकतो! आता खरे-खोटे देव जाणो. पण, परवा संसदेत असे काही घडत असताना, राहुल गांधींचे असे आश्वस्त उभे राहणे, खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. धन्यवाद सुप्रिया श्रीनेत, तुमच्या नेत्याचा फोटो आणि विधान तुम्ही पोस्ट केलेत. त्यामुळे जनतेच्या मनात विचारमंथन सुरू झाले.
 
आसाम सरकारचे अभिनंदन!
 
नुकतेच आसाममधील ३१ जिल्ह्यांतील १ हजार, २8१ मदरशांचे रुपांतर मिडल इंग्लिश स्कूलमध्ये तत्काळ आदेशाने करण्यात आले. मागे आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले होते की, ”आम्हाला शाळा, महाविद्यालय आणि विश्वविद्यालय हवे. इस्लाम धार्मिक संस्था नकोत.” काही मदरशांचे रुपांतर शाळेत केल्यानंतर २०२३ साली ३ हजार, ७४8 मुस्लीम विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आले.असो.
 
सप्टेंबर २०२२ मध्ये आसाम गोलपारा येथील मदरशामधील एक शिक्षक ’अल कायदा’ दहशतवादी संघटनेशी संबंधित होता, म्हणून स्थानिक मुस्लिमांनी मदरसा तोडला होता. याचाच अर्थ आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन सुख-शांतीत, इज्जतीमध्ये जगावे असे समाजालाही वाटते. तसेही त्याशिवाय त्यांच्यापुढेही पर्याय काय आहे? अस्मानी किताबमधल्या सगळ्याच गोष्टींनाच जगाचे अंतिम सत्य मानून चालले तर काय होते, याचा अनुभव जगाने घेतला आहेच. भारतात ‘मदरसापर्व’ कसे सुरू झाले? तर ११९२ साली मोहम्मद घोरीच्या काळात भारतात पहिला मदरसा उघडला गेला. त्यानंतर कोलकाता येथे १७8० साली गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्सने मदरशांना अधिकृतरित्या मान्यता दिली. कोलकात्याच्या मुसलमानांनी त्याच्याकडे तशी मागणी केली होती म्हणे.
 
देशातील चार टक्के बालक मदरशांमध्ये जातात, असे सर्वेक्षण सांगते. मदरशांमध्ये शिकणारी मूलं पदवी मिळवून इमाम, मौलाना, मुफ्ती बनतात. मुस्लीम समाजाचे ते धर्मगुरूच असतात. त्यांचे सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरचे ज्ञान काय असेल? फतवेबितवे हीच मंडळी काढत असतात. त्यांनी आजवर काढलेले फतवे पाहिले की, आश्चर्यचकित व्हायला होते. हे कोणते जग असे वाटते? पण, ते जिथे शिकतात, तो मदरसा म्हणजे काही प्रमाणित शिक्षणसंस्था नाही. इथे ’दीनी तालीम’ म्हणजे ’धार्मिक शिक्षण’ दिले जाते. मदरशाचे विषय काय असतात, तर मौलवी-मुन्शी, आमिल, फाजिल, कामिल, कारी, अरबी, फारसी. आता-आता तर यासोबत तोंडी लावायला उर्दू, हिंदी, इंग्रजी, सामाजिक विज्ञान, विज्ञान, नागरिकशास्त्र आणि संगणक हा वैकल्पिक विषय शिकवला जातो. त्यामुळे आसाम सरकारने मदरशांबद्दल घेतलेल्या निर्णयाने मुस्लीम समाजाचे, आसामसोबत देशाचेही भलेच होणार आहे.
९५९४९६९६३8
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.