यादव सरकारचा पहिलाच मोठा निर्णय; उघड्यावर मांसविक्री करता येणार नाही!

    14-Dec-2023
Total Views |
Madhya Pradesh CM Mohan Yadav

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार परवानगीनंतरच धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या मोठ्या निर्णयाचा भाग म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर उघड्यावर मांसविक्रीवर बंदी घालण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

तसेच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. उघड्यावर मांसविक्री अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, “आज पहिल्या कॅबिनेट बैठकीत अनेक चर्चा झाल्या. मांसाच्या खुल्या विक्रीचा मुद्दा आम्ही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे आणि त्यासाठी नियम आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.




त्याचबरोबर लाऊडस्पीकरबाबत जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच लाऊडस्पीकर वापरता येणार आहेत. लाऊडस्पीकरचा वापर धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठीच करता येईल. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यांना दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. या आदेशात म्हटले आहे की, “धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी अनियमित किंवा अनियंत्रित लाऊडस्पीकरच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी.” सरकारने या ध्वनिक्षेपकांच्या वापरासाठी पूर्वपरवानगीही बंधनकारक केली असून या ध्वनिक्षेपकांसाठी डेसिबल मर्यादाही निश्चित केली आहे.

या आदेशात सुप्रीम कोर्टाच्या जुलै २००५ च्या निकालाचा हवाला देऊन सार्वजनिक ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता (सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती वगळता) ध्वनी प्रदूषणामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणामांमुळे लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती.
 
दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी उज्जैन दक्षिणेतील भाजप आमदार मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ५८ वर्षीय डॉ. मोहन यादव यांना भोपाळ येथील लाल परेड मैदानावर राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी पदाची शपथ दिली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे शीर्ष नेतृत्व तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शिवराज चौहान सरकारमध्ये मंत्री असलेले मोहन यादव यांची दि.११ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.