३० डिसेंबरपासून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू! वाचा सविस्तर
14-Dec-2023
Total Views | 150
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून यासंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार आता तुम्ही दिल्ली-अहमदाबादमध्ये राहत असाल आणि अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला बस-ट्रेननेच नव्हे तर विमानानेही प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे विमान ३० डिसेंबर रोजी दिल्ली ते अयोध्येला पहिले उद्घाटन उड्डाण घेणार आहे.
इंडिगोच्या मते, पहिल्या टप्प्यात अयोध्येपासून दिल्ली आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू होतील. कंपनी ६ जानेवारीपासून अयोध्येसाठी आपली विमानसेवा सुरू करणार आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, दिल्लीहून विमान ३० डिसेंबरला अयोध्या विमानतळावर पोहोचेल. यानंतर पुढील वर्षी 6 जानेवारी 2024 पासून दिल्ली आणि अयोध्या दरम्यान थेट विमानसेवा सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच अहमदाबाद आणि अयोध्या दरम्यान 11 जानेवारी 2024 पासून आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे सुरू होतील.
६ जानेवारी रोजी पहिले विमान दिल्लीहून सकाळी ११.५५ वाजता उड्डाण करेल आणि दुपारी १.१५ वाजता अयोध्येला पोहोचेल. हे विमान अयोध्येहून दुपारी 1.45 वाजता सुटेल आणि दुपारी 3 वाजता दिल्लीला पोहोचेल. सध्या इंडिगो एअरलाइन्समध्ये ६ जानेवारीला दिल्ली ते अयोध्येचे भाडे ७,७९९ रुपये आहे.