‘भारतमाता की जय’च्या घोषणेची मिशनरी शाळांना एलर्जी

    12-Dec-2023   
Total Views |
Missionary school suspended eight students for chanting ‘Bharat Mata Ki Jai’ in the campus

अलीकडच्या काळात हिंदू विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारणांवरुन विशेषकरुन सण-उत्सव, घोषणाबाजीवरुन मिशनरी शाळांमध्ये लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. हातावर मेहंदी लावली, भगवा स्कार्फ परिधान केला, जय श्रीरामचा नारा दिला आणि आता तर ‘भारतमाता की जय’ घोषणा दिली म्हणून राजस्थानमधील एका शाळेने विद्यार्थ्यांना चक्क निलंबित केले. त्यानिमित्ताने मिशनरी शाळांचा हा हिंदूद्वेष निश्चितच चिंताजनक म्हणावा लागेल.
 
राजस्थानच्या बारन जिल्ह्यातील अंता येथील इमन्युअल मिशन स्कूलमधील आठ विद्यार्थ्यांनी नुकतीच ‘भारतमाता की जय’ ही घोषणा दिल्याबद्दल, त्यांना शाळा संचालकांनी सात दिवसांसाठी निलंबित करण्याची संतापजनक घटना घडली. शिक्षणाच्या नावाखाली धर्मप्रचाराचे कार्य करणार्‍या, या मिशनरी संस्थांना आपण अजून ब्रिटिश काळामध्ये वावरत असल्याचे वाटत असावे! मिशनरी शाळेने ही जी कृती केली, त्याचा समाजाच्या विविध थरांतून निषेध होत आहे. दि. ६ डिसेंबर रोजी करणी समाजाचे नेते सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजपूत समाज आणि राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांनी अंता शहरात निषेध मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये या मिशनरी शाळेचे आठ विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. पण, त्यांना चक्क शाळेच्या नियमांचा भंग केल्याचे कारण पुढे करून, सात दिवसांसाठी निलंबित करण्यातल आले. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पत्राद्वारे तसे कळविण्यात आले. या विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये अशी कोणतीही कृती करू नये, म्हणून पालकांनी त्यांना मार्गदर्शन करावे, असेही शाळेने आपल्या पत्रातून कळविले आहे. शाळेच्या या निर्णयाविरुद्ध पालकांनी आणि अन्य हिंदू बांधवांनी आपला निषेध नोंदविला. पण, शाळा आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

त्यानंतर भाजप आमदार कंवर लाल मीणा यांनी या संदर्भात शाळा व्यवस्थापनाशी बोलणी केली. शाळेने जी आडमुठी भूमिका घेतली आहे, त्यामुळे विविध हिंदू गट संतप्त झाले असून, शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांना पत्र लिहून संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे. अजूनही भारतात मिशनरी संस्थांकडून ज्या शाळा चालविल्या जातात, त्यामध्ये कशी वागणूक दिली जात आहे, हे या उदाहरणावरून लक्षात येते.

भाजपच्या विजयाने काँग्रेस आमदाराने तोंडाला काळे फासून घेतलेच!

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. पण, भाजप विजयी होता कामा नये, म्हणून काही राजकारणी पाण्यात देव ठेवून बसले होते. असाच एक निर्धार काँग्रेसचे आमदार फुलसिंह बरैया यांनी केला होता. निर्धार नव्हे, तशी शपथच त्यांनी घेतली होती. “मध्य प्रदेशात भाजपला ५० जागा मिळाल्यास मी माझे तोंड काळे करीन किंवा तोंडाला काळे फसेन,” असा निश्चय या आमदाराने केला होता. या निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या पारड्यात घसघशीत दान टाकले. त्यामुळे जी घोषणा केली होती, त्याची पूर्तता करण्याची पाळी या काँग्रेस नेत्यावर आली. पण, एक विशेष म्हणजे या आमदाराने आपला शब्द फिरवला नाही. आपल्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत फुलसिंह बरैया हे दि. ७ डिसेंबर रोजी भोपाळच्या राजभवनाबाहेर जमा झाले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेही या काळे फासून घेण्याच्या कार्यक्रमास उपस्थित होते, हे विशेष! काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी फुलसिंह बरैया यांच्या विनंतीवरून त्यांच्या चेहर्‍यास थोडे काळे फसले. आणखी काळे फासण्याचे विनंती मात्र दिग्विजय सिंह यांनी अमान्य केली. आपण चेहरा का काळा केला, याचे कारण सांगताना, “लोकशाहीचे आणि घटनेचे संरक्षण करण्याबद्दलची आपली वचनबद्धता दाखवून देण्यासाठी, प्रातिनिधिक स्वरुपात आपण ही कृती केली,“ असे फुलसिंह बरैया यांनी स्पष्ट दिले. “मी माझ्या शब्दाला जागलो. मी आणि काँग्रेस लोकशाहीसाठीचा लढा सुरूच ठेवू,” असेही त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात आणि अन्यत्र लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेस हरली, हे दिसत असताना, त्या पराभवाचे खापर दुसर्‍या पक्षाने लोकशाही धोक्यात आणल्याचा कांगावा करून, त्यांच्यावर कशाला फोडता? काँग्रेसने लोकशाहीच्या नावाखाली आपली राजवट असताना आपली घरे भरण्यापलीकडे काय केले? झारखंडच्या काँग्रेस खासदाराने जी माया जमा केली ती नुसती आठवा! लोकशाही कोणामुळे धोक्यात आली, त्याची कल्पना त्यावरून येईल. उगाच विरोधी पक्षावर खापर कशाला फोडता! काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजी हे पराभवाचे एक कारण होते, हे अजून लक्षात नाही का आले? त्या गटबाजीतूनच काळे फासून घेण्याच्या जाहीर कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी हजेरी लावली ना! भाजपकडे सत्ता आल्याने लोकशाही आणखी भक्कम झाली आहे, हे लक्षात घ्या फुलसिंह बरैया!

भाजपला मत दिले म्हणून दिराकडून मारहाण!

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यात भाजपचा मोठा विजय झाला. मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बेहना योजने’सारख्या विविध योजनांनी मतदारांवर प्रभाव पाडला. त्यामुळे महिलांनीही भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले. मुस्लीम महिला मतदारांनीही भाजपच्या पारड्यात आपली मते टाकली. पण, भाजपला मतदान केले, हे काही लोकांना सहन झाले नाही. अशीच एक घटना उजेडात आली आहे.

जावेद खान नावाच्या एका व्यक्तीने विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान केले म्हणून आपली वहिनी समीना हिच्यावर अमानुष हल्ला केला. दि. ३ डिसेंबरच्या मतमोजणीमध्ये भाजप सत्तेवर येत असल्याचे पाहून, समीनाने आपल्या मुलांसमवेत आनंद साजरा केला. पण, हा आनंद क्षणभंगुर ठरला. दुसर्‍या दिवशी समीनाची राजकीय निवड पाहून, संतापलेल्या जावेद खान याने तिच्यावर हल्ला केला. हाताने, काठीने जावेद खान याने त्याच्या वहिनीस मारझोड केली. जावेद खान याची बायकोही या मारझोडीस प्रोत्साहन देत होती, अशी माहितीही बाहेर आली आहे. ही मारहाण होत असताना, शेजारी पंडित विद्या सागर यांनी हस्तक्षेप करून, तिची सुटका केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करूनही पोलीस निष्क्रिय राहिल्याने जिल्हाधिकारी प्रवीण पांडे यांच्याकडे धाव घेतली. त्यांतर आता जावेद खान याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पण, ही घटना घडल्यापासून जावेद खान हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा ’राष्ट्रीय पनसमंद मुस्लीम महासंघा’च्या मध्य प्रदेश शाखेचे अध्यक्ष नौशाद खान यांनी निषेध केला आहे.

दहशतवादाविरुद्ध गिलगीटमध्ये निदर्शनाचे आयोजन

गिलगीट-बाल्टिस्तानमधील वाढती महागाई आणि दि. २ डिसेंबर रोजी त्या भागातील चिलास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ‘अवामी नॅशनल कमिटी’ने दि. १५ डिसेंबर रोजी त्या भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे योजले आहे. रावळपिंडीकडे जात असलेल्या एका बसवर काही अज्ञात अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या घटनेत किमान दहा प्रवासी ठार आणि अन्य २१ जखमी झाले. या घटनेनंतर जनतेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जनतेने स्कार्डू, चिलास आणि गिलगीट येथे रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. दहशतवाद्यांना रोखण्यामध्ये शासन आणि अन्य सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याबद्दल जनतेने आपला रोष व्यक्त केला. चिलास हा भाग पर्वतीय असून, तो खैबरपख्तुनख्वा प्रांताला लागून आहे. या भागात अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत. गिलगीट-बाल्टिस्तानमधील जनतेला अन्नधान्यांची टंचाई, महागाई आणि दहशतवाद या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या व्याप्त प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट पाकिस्तान करीत असून, तेथील जनतेवर जबर कर आणि वाढीव वीज देयक लादण्यात आले आहे, असे तेथील जनतेचे म्हणणे आहे. या प्रदेशात राहणार्‍या जनतेला भारतासमवेत ऐक्य साधायचे आहे. तेथील नागरी संघटना स्थानिक जनतेला राजकीय आणि आर्थिक हक्क मिळायला हवेत म्हणून निदर्शने करीत आहेत. तेथील जनतेवर जो अन्याय होत आहे आणि जो दहशतवाद माजला आहे, त्याविरुद्ध तेथे दि. १५ डिसेंबर रोजी निदर्शने योजण्यात आली आहेत.

९८६९०२०७३२


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.