महामुंबईतील ‘नैना’ क्षेत्राचे विकासाचे व्हिजन

    12-Dec-2023   
Total Views |
Government Plans for Mumbai City MMR Development

सध्या बहुप्रतीक्षित धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत स्थानिकांसह काही राजकीय पक्षांनीही विरोधाची भूमिका घेतल्यामुळे या प्रकल्पाला विलंब होण्याची आणि पर्यायाने बांधकाम खर्चात भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रकारे महामुंबईतील महत्त्वाकांक्षी तिसरी मुंबई अर्थात ‘नैना’ शहर प्रकल्पाविरोधातही विरोधाचे सूर कानी पडू लागले आहेत. त्यानिमित्ताने महामुंबईच्या विकासपर्वात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाविषयी...
 
एकीकडे जुनी मुंबई अनियमितरित्या विकसित झालेली, तर दुसरीकडे नवी मुंबई नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित झालेली दिसते. परंतु, महामुंबईतील ‘नैना’ क्षेत्र कसे विकसित होणार आहे, त्याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे महामुंबईतील विमानतळाच्या जवळील प्रभावित क्षेत्र लवकर विकसित होणार, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. पण, हा विकास जर योजनाबद्ध केला, तर ‘नैना’मधील नागरिकांचे भले होईल.
आणखी एक फायदा म्हणजे ‘नैना’मुळे महामुंबईचा भविष्यातील विकास हा आगगाडीच्या इंजिनासारखा वेग आणि शक्ती पुरविणारा राहील. ‘सिडको’च्या माध्यमातून ‘नैना’ क्षेत्राबरोबरच महामुंबईचा विकासदेखील लवकर गतिमान होईल. तसेच ‘नैना’ शहर क्षेत्र देशातील आधुनिक पद्धतीने विकसित होऊ घातलेले सर्वात मोठे शहर म्हणून नावारुपाला येणार आहे. या विकसित होणार्‍या महत्त्वाकांक्षी शहराचा सर्वांगीण विकास होत असल्यामुळे, तेथील नागरिकांचे आयुष्य उच्च दर्जाचे राहील व या शहराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्र राज्याची मान व शान उच्च पदाला पोहोचेल.

हे ‘नैना’ शहर क्षेत्र खरे म्हणजे सुमारे दहा वर्षांपूर्वीच ‘सिडको’ने विकसित करण्यासाठी हाती घेतले होते. परंतु, काही अपरिहार्य कारणांनी हा योजलेला विकास ‘सिडको’ करू शकली नाही. पण, आता यापुढे ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. ‘नैना’ क्षेत्र म्हणजे विमानतळाच्या प्रभावाखाली सर्वसाधारणपणे येणारा २५ किमी त्रिज्येच्या अंतरावरील विकासाधीन प्रदेश. हा भाग नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर मोठ्या भरभराटीला येणार आहे व ‘सिडको’ उच्च दर्जाच्या आधुनिक पद्धतीने या ‘नैना’ शहराला (३७१ चौ. किमी क्षेत्र) आराखडा बनवून मोठा विकास साधणार आहे. या आखलेल्या जमीन क्षेत्रात १७४ गावांचा समावेश असून, या जमिनीचा ताबा पारंपरिक पद्धतीने नव्हे, पण नवीन आधुनिक रीतीने विकसित केला जाणार आहे. ‘नैना’ शहर हे साधारणपणे मुंबईच्या क्षेत्राइतके, पण नवी मुंबईच्या क्षेत्राहून मोठे असे क्षेत्र असेल. प्रारंबीची दहा वर्षे जरी विकासकामाला योग्य ठरली नसतील, तरी यापुढे या क्षेत्राच्या विकासाकरिता जमिनींची आखणी, परवडणार्‍या घरांची बांधणी, पायाभूत सेवावाहिन्यांचे जाळे गठन होणे आणि शासकीय यंत्रणा घेऊन ‘सिडको’कडून विकास साधायला करायला सुरुवातदेखील झाली आहे.

आखलेल्या विकासयोजनेतील दूरदृष्टी

या विकास योजनेखाली गावकरी त्यांच्या जमिनी लवकरच विकासासाठी एकत्र आणतील. चार हजार चौ.मी व अधिक क्षेत्रात ‘क्लस्टर योजने’खाली गृहबांधणी झाली, तर त्यांना नियमानुसार अनेक सवलतींचा लाभ घेता येईल. विकास करणारी संस्था (सिडको) ही गावकर्‍यांनी एकत्र आणलेली जमीन योजनाबद्ध पद्धतीने विकसित करणार आहे. ‘सिडको’च्या योजनेखाली सर्व क्षेत्राच्या ६० टक्के जमिनीवर पायाभूत प्रकल्पाच्या सेवावाहिन्या बांधल्या जातील व प्रकल्पबाधित गावकर्‍यांना उरलेली ४० टक्के जमीन २.५ चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) घेऊन गृहबांधणी करण्यास मान्यता देईल. ‘सिडको’ला या जमिनी विकसित करण्यासाठी जमीन मालकाला काही नुकसान भरपाई देण्याची गरज भासणार नाही. परंतु, या नवीन पद्धतीमुळे जी काही जमीन विकसित होईल, त्यामुळे मालमत्तेचे मूल्य अनेक पटीने वाढीस लागेल. शिवाय ही अनेकपटींनी वाढलेल्या मूल्यांची जमीन-मालमत्ता जुन्या व नवी मुंबईच्या जवळच असल्यामुळे त्याचा ‘कनेक्टिव्हिटी’विषयक लाभ उठविण्यासाठी सोयीची ठरणार आहे व त्यातून ‘नैना’ क्षेत्रातील रहिवाशांना अनेक नोकरी-धंद्याच्या व इतर विविध विकासाच्या संधी मिळतील.

यातील मुख्य प्रकल्प म्हणजे, यात अपुर्‍या प्राप्तीच्या जनसमुदायाला परवडणारी घरे बांधण्यासाठी (EWS and LIG) योजनेखाली म्हणजे, चार हजार चौ.मी व अधिक जागा व्याप्त करून झालेल्या भूखंडांना सोयीने विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. हा सगळा खटाटोप २० टक्के क्षेत्रात सामावला जाईल. सध्या २३ गावांकरिता अशा एकत्रित विकास योजनेला ‘सिडको’ने मंजुरी दिली आहे. ‘सिडको’ने ही योजना १२ टाऊन प्लॅनिंग स्किममध्ये (TPS) समाविष्ट केली आहे.

याविषयी ‘सिडको’चे उपाध्यक्ष व मुख्य संचालक अनिल डिग्गीकर म्हणतात की, “ ‘सिडको’कडून ‘नैना’ क्षेत्राचा महामुंबईतील अत्युच्च आधुनिक पद्धतीने विकास साधून विविध अंगांनी भरभराट केली जाईल. त्यात सर्व म्हणजे ‘ईडब्ल्यूएस’, ‘एलआयजी’, ‘एमआयजी’, ‘एचआयजी’ अशा सर्व कमावत्या वर्गांना योग्य असे शिक्षण, आरोग्य, व्यापार, पर्यटन, आदरातिथ्य वगैरे विविध विभाग असतील. ‘नैना’च्या सुरुवातीच्या काळी या विकासयोजनेला थोडा विलंब लागला. पण, आता ‘सिडको’ने कार्यक्षम व्यवस्थापनाच्या साहाय्याने विकास कार्यरत होण्यासाठी गृहबांधणीकरिता झटपट मान्यता देणारी प्रणाली अंगीकारण्याचे ठरविले आहे. पायाभूत सेवांकरिता रुपये १ हजार, २१६ कोटी खर्चाचे प्रकल्प ‘नैना’ क्षेत्राकरिता या वर्षाच्या सुरुवातीच्या काळापासून हाती घेण्यात आले आहेत.”

या कामाकरिता रस्ते, पदपथे व पर्जन्यजल वाहिन्या बांधण्यासाठी सहा निविदा मागविल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे निविदा परत मागवाव्या लागल्या आहेत. तसेच, ‘नैना’ क्षेत्रातील देवड गावापासून नवीन पनवेलपर्यंत जाण्यासाठी पूल बांधायला घेतला आहे. योजनेतील नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील कामे पुढील तीन वर्षांत पूर्ण होतील, असा अंदाज आहे. या पायाभूत कामांमुळे ‘नैना’ क्षेत्रातील गृहबांधणीची कामे सोयींनी करता येतील.

विकासासाठीच्या पथकात महसूल व जमीन सर्वेक्षण विषयक कामांसाठी २२ विशेष अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी जमिनीच्या मालकांच्या नावाची अद्ययावत नोंदणी, मोजमाप, मालमत्ता क्षेत्र कार्ड व नकाशे बनविणे इत्यादी कामे लवकरात लवकर पूर्ण करतील.

राज्य सरकारने नवी मुंबईत सुलभ वाहतुकीकरिता अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यांचाही ‘नैना’ क्षेत्रासाठी या प्रकल्पांचा वाढीव विकासासाठी लाभ घेता येईल. ते प्रकल्प पुढीलप्रमाणे-

१. शिवडी-नाव्हा शेव्हा मुंबई खाडीपार अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) लवकरच पूर्ण होणार आहे.

२. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. या प्रकल्पाचे योजलेले सत्र (phase) डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे.

३. पनवेल ते कर्जत रेल्वेमार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. याची लांबी २९.६ किमी असणार आहे, त्यावर सहा स्थानके राहतील व हा मार्ग तीन बोगद्यांतून जाईल. हा रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

४. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय व आठ ते दहा मार्गिकांचा द्रुतगती मार्ग प्रकल्प. हा मार्ग महामुंबईच्या पश्चिमेकडील उपनगरांना ठाणे, पालघरशी जोडेल. नवी मुंबईला व रायगड जिल्ह्यातील अलिबागला जोडला जाईल. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २०२७ साल उजाडेल.

या सगळ्या वाहतूक प्रकल्पांचा लाभ घेण्यासाठी ‘सिडको’च्या योजनेत नवी मुंबई विमानतळाभोवती व ‘नैना’ क्षेत्रामध्ये हवाई प्रवाशांच्या सोयीकरिता ‘एरोट्रापॉलिस’ बांधले जाणार आहे. म्हणजे (टॅक्सी वाहतूक, हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, करमणूक साधने इत्यादी).

भविष्यातील ‘नैना’ शहर कसे असेल?

सर्व कमावत्या वर्गाच्या नागरिकांच्या आवडीचे, नागरिकांना राहण्याची मनपसंत घरे, सर्वसाधनयुक्त, व्यापारविषयक, उद्योगधंद्याची कामे, वखार वा गोडाऊन असलेली, गावे नागरीकरण झालेली, विविध शिक्षण, करमणूक देणारी, अत्युच्च व आधुनिक पायाभूत व नागरी सेवा देणारी व पर्यावरणशील विकास साधणारे ‘नैना’ क्षेत्र असेल.
नागरी सोयींनी युक्त, वैद्यकीय सुविधा, क्रीडाविषयक प्रेरणा देणारे, विज्ञानयुक्त, विकसित बंदर असणारे, संशोधन व विकास करणारे, पर्यटनप्रेरक, फिल्मी करमणूक अशा सर्व सोयीसुविधांनी सज्ज हे शहर देशविदेशातील गुंतवणुकीदारांच्या आवडीचे केंद्र बनेल, यात म्हणूनच शंका नाही.

‘सिडको’कडून रस्ते (कमीतकमी ४५ फूट रुंदीचे), शैक्षणिक विकास कामे, रुग्णालये, उद्याने, वृक्षवाढ केंद्र, पाणीपुरवठा व स्युवेज ट्रिटमेंट प्रक्रिया केंद्रे बांधली जाणार आहेत.

‘नैना’ शहराला मुंबई-पुणे व इतर महामार्गावरून प्रवेशाचे प्रशस्त मार्ग असतील. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई मार्ग, रेल्वे, मेट्रो मार्ग असे सोयीचे असतील. या सोयीच्या दळणवळणामधून कामधंदे व अर्थविषयक विकासकामे करता येतील. नोकरी व कामधंद्याच्या खूप संधी मिळतील.

‘नैना’ शहर खरोखर आदर्श बनणार का?

सरकारकडून नवी मुंबई, नवी नाशिक, नवीन छ. संभाजीनगर, धारावी, इतर वाहतूक प्रकल्प या सगळ्यांचा जुना व अलीकडचा इतिहास बघितला, तर तो अनुभव कटूच म्हणावा लागेल. कारण, प्रत्येक ठिकाणी रहिवाशांकडून या ना त्या कारणास्तव विरोध होताना दिसतो. पण, तरीही राज्य सरकारने ‘नैना’ शहराकरिता मोठ्या आशा ठेवल्या आहेत. सुरुवातीच्या दहा वर्षांच्या ‘नैना’च्या काळात काय घडले व विकास का घडू शकला नाही, ते सरकारने स्पष्ट करावे. सरकारने ‘नैना’ची आशा दाखविण्याच्या आधी नागरिकांच्या अडचणींचा खोलवर अभ्यास करणे इष्ट आहे. म्हणजे विकास शांततेने होऊ शकेल.

‘सिडको’च्या नवीन योजनेत ‘नैना’च्या प्रथमच्या विकासपर्वामध्ये ‘सिडको’ने ज्या २३ गावांची निवड केली आहे, त्यांनीही विरोध दर्शविला आहे. तेव्हा, पर्यावरण, गावकर्‍यांचे हित अशा सर्वच पातळीवर सुसंवादातून हा शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त होईल आणि महामुंबईच्या विकासाचा एक नवीन अध्याय रचला जाईल, हीच सदिच्छा.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.