कष्टकरी महिलांची दीपस्तंभ

    12-Dec-2023   
Total Views |
Article on Shobha More

शेतकर्‍याची पोर ते कामगाराची पत्नी, पुढे दोन मुलींची आई असताना एसटी महामंडळात वाहनचालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार्‍या शोभा मोरे यांच्याविषयी...

छत्रपती संभाजीनगरच्या शोभा मोरे यांच्या पतीची प्रभाकर यांची वामन मोटर ड्रायव्हिंग स्कूल होतीच. तिथेच शोभा यांनी मुलींना दुचाकीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या सेंटरच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे शोभा शेकडो मुलींना दुचाकीचे प्रशिक्षण देत आहेत. ’शून्य अपघात’ संकल्पना प्रत्यक्षात १०० टक्के कार्यान्वित व्हावी, असा शोभा यांचा ध्यास. त्यासाठी शोभा जनजागृती करतात. त्याचबरोबर शोभा या एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर क्रमांक दोन डेपो येथे चालक अधिक वाहक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते एसटी महामंडळ प्रशिक्षण नियुक्तीपत्रही देण्यात आले होते.

त्यांचे कर्तृत्व कदाचित कुणाला विशेष कर्तृत्वही वाटणार नाही, पण त्यांचा जीवनप्रवास पाहिला, तर जाणवते की, सामान्यातले असामान्यत्व म्हणजे शोभा यांचा जीवनप्रवास. शोभा यांचे माहेर सिल्लोडचे. माहेरच्या त्या बावस्कर. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला धम्म आवर्जून जगणारे हे कुटुंब. रंगनाथ बावस्कर आणि अहिल्याबाई यांना सहा अपत्ये. त्यापैकी शोभा सगळ्यात मोठ्या. रंगनाथ शेतकरी होते, तर आईही घर सांभाळून शेतीभातीत राबे. शोभा यांना तर लहाणपणापासूनशिक्षणाची आवड. त्यांना वाटायचे की, आपण शिक्षक व्हावे. डॉ. बाबासाहेबांनी शिकण्याचा मंत्र दिला. आपण खूप शिकावे. मात्र, बावस्करांच्या संयुक्त कुटुंबातील काही मोठ्या लोकांना वाटले की रंगनाथ यांना चार मुली आणि दोन मूलं. चार मुलींची लग्न कधी होणार? त्यासाठी मोठ्या मुलीचे लग्न लवकर करायला हवे. वयाच्या १४व्या वर्षी आठवीला असताना शोभा यांचा विवाह प्रभाकर मोरे यांच्याशी झाला.

शोभा पहाटे ४ वाजता उठायच्या. अख्ख्या घरादारासाठी राबता राबता रात्र कधी व्हायची, त्यांना कळायचेच नाही. सगळ्या कष्टात सुख एकच होते ते म्हणजे त्यांच्या पती प्रभाकर यांची साथ. ते एका नामांकित कंपनीत कामाला होते. प्रभाकर यांनी छ. संभाजीनगर येथे घर बांधले आणि तिथे त्यांनी आई-वडील आणि दोन भावांना त्यांच्या कुटुंबासकट राहायला बोलावले. आता शोभा यांच्या लग्नाला १२ वर्षे होऊन गेली होती. पदरी दोन मुली होत्या. सगळे ठीक असतानाच प्रभाकर यांची नोकरी सुटली. नोकरी सुटली आणि घरातले वातावरण बदलले.

हिचा पती कमवत नाही, त्यात हिला दोनच मुली, असे म्हणून शोभाला हिणवले जाऊ लागले. एका रात्री शोभा यांचे सामान घराबाहेर फेकण्यात आले आणि प्रभाकर यांना सांगण्यात आले की, ”तुला या बाईने दोन मुलीच दिल्या. मुलगा नाही, दे तिला टाकून.” त्यावेळी प्रभाकर म्हणाले, “ती माझी पत्नी आहे. ती तिथे मी.” ते शोभा आणि मुलींसकट घरच्या वरच्या भागात राहू लागले. घरखर्च भागवण्यासाठी शोभा यांनी चार घरची धुणीभांडी करण्याचे ठरवले. अल्पशिक्षणामुळे नोकरी मिळणार नाही, असे त्यांना वाटले. प्रभाकर यांनी त्याच दिवशी शोभा यांना रात्रशाळेत प्रवेश मिळवून दिला. २९-३० वर्षांची आणि दोन मुलांची आई असलेली शोभा शाळेत जाते, हा काही जणांसाठी थट्टेचा विषय झाला. ते शोभांना पाहून म्हणत, ”डंगरी आली पाहा. मोठी शिकणार हं!!” पण, दहावीचा निकाल लागला आणि शोभा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. “तुम्ही जिला डंगरी म्हणता, ती पास झाली बरं...” असे म्हणून तेव्हा प्रभाकर यांनी पाच किलो पेढे गावात वाटले.

असो. प्रभाकर यांनी शोभा यांना सर्व प्रकारचे वाहन चालवण्यास शिकवले होते. तसेच शोभा यांनी अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळवला होता. वाहनचालकाची नोकरी करावी म्हणून शोभा यांनी ‘सिडको’मध्ये बस चालकाच्या नोकरीची परीक्षाही दिली. त्यांनी कधीच संगणक हाताळला नव्हता आणि लेखी परीक्षा होती संगणकावर. त्यामुळे त्यांना केवळ १५ गुण मिळाले. तरीही त्यांनी हिंमत गमावली नाही. कारण, त्यांच्या पतीची भक्कम साथ त्यांना होती. पुढे त्यांनी ‘एमएसईबी’मध्ये वाहनचालकची परीक्षा दिली. सगळ्या परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या.

मात्र, क्रिमीलेयरचे सर्टिफिकेट नव्हते म्हणून त्यांची संधी हुकली. याही वेळी त्यांनी ठरवले की, आपण प्रयत्न करतोय तर पूर्ण करायचे. त्यानुसार मग एसटी महामंडळामध्ये बसचालकांची भरती निघताच त्यांनी त्यासाठी अर्ज केला. ज्या महिलांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळणार होती. शोभाकडे अवजड वाहने चालवण्याचा परवाना असल्याने त्यांना प्रशिक्षण न देता तत्काळ परीक्षेसाठी पुणे-भोसरी येथे पाठवण्यात आले. तिथे एसटी चालवताना किंचित चूक झाली. शोभा यांना अनुत्तीर्ण घोषित केले गेले. नोकरीची संधीही नाकारली गेली.

मात्र, तिथल्या अधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला. कारण, पुणे-भोसरी येथे एसटी चालकाची परीक्षा देणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या. अवजड वाहन चालकाचा परवाना नसलेल्या मुलींना प्रशिक्षण मिळून त्या परीक्षा देणार होत्या, हे शोभा यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी एसटी महामंडळाकडे मागणी केली की, ”मला एक वर्ष नको, केवळ दोन महिने प्रशिक्षण द्या. मी एसटी महामंडळाची परीक्षा उत्तीर्ण होईनच.” प्रशिक्षण मिळून परीक्षा द्यायची संधी मिळावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. काही महिन्यांनंतर त्यांच्या चिकाटीला फळ मिळाले. त्यांना प्रशिक्षण देण्यास मान्यता मिळाली. त्यांनीही त्या संधीचे सोने केले. आज त्या एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहक आहेत. घरदार सांभाळून संस्कृती जपत मोठ्या कष्टाने ध्येय साध्य करणार्‍या शोभा यांचे कर्तृत्व करोडो कष्टकरी महिलांसाठी दीपस्तंभासारखेच!

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.