ठाणे : आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शहापूर, मुरबाड आणि कर्जत येथील धान्य खरेदी केंद्रांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश आ. संजय केळकर यांनी केला होता. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी अशा १४ जणांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यापूर्वीच तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे संपूर्ण राज्यभर पसरली असल्याने एसआयटी द्वारे चौकशीची मागणी आ.केळकर यांनी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर कार्यालया मार्फत २०२०-२१ या वर्षात धान्य खरेदी योजनेत ५ हजार ६३३ क्विंटल धान्याचा घोटाळा झाला होता. ही बाब आ. संजय केळकर यांनी उघडकीस आणून अधिवेशनात कारवाईची मागणी केली होती. याबाबत त्यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याशीही चर्चा करून एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार विजय गांगुर्डे, तत्कालीन अप प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह आशिष वसावे आणि गुलाब सद्गिर यांना निलंबित करण्यात आले.
आदिवासी विकास महामंडळांतर्गत केवळ शहापूरच नव्हे तर ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील केंद्रांवर शेकडो कोटींचा धान्य घोटाळा झाल्याचा आरोप आ.केळकर यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नुकतेच शहापूर, मुरबाड आणि कर्जत येथे ११ कोटी ४८ लाख २२ हजार ३४८ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी १४ जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे यांचे पुतणे हरीश दरोडा यांचा समावेश आहे. केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील धान्य खरेदी केंद्रांमध्ये शेकडो कोटींचा धान्य खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तेव्हा या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी आ.केळकर यांनी केली आहे.
अध्यक्ष दरोडा यांचाच दरोडा ?
शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात साकडबाव खरेदी केंद्रात ५१२० क्विंटल धान्य घोटाळा आणि १२ हजार ८०३ बारदाना असे मिळून एक कोटी ६० लाख, ८९ हजार २५८ रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा, सचिव संजय पांढरे, केंद्र प्रमुख जयराम सोगिर, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार विजय गांगुर्डे, तत्कालीन उप प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड आणि तत्कालीन विपणन निरिक्षक समाधान नागरे अशी आरोपींची नावे नमुद आहेत.तर वेहळोली केंद्रात ६४६६.४२ क्विंटल धान्य आणि बारदाना असे मिळून दोन कोटी ७३ लाख १६ हजार ८४३ रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अविनाश राठोड आणि विजय गांगुर्डे या माजी अधिकाऱ्यांसह विपणन निरिक्षक महेश येवले आणि केंद्र प्रमुख प्रविण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
माजी अधिकारीही कचाट्यात
मुरबाड तालुक्यातील न्याहाडी केंद्रात १९,९९१ क्विंटल धान्य आणि ४९९७९ बारदाना असा सहा कोटी २८ लाख ११,१८० रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून टोकावडे पोलीस ठाण्यात अविनाश राठोड, विजय गांगुर्डे या माजी अधिकाऱ्यांसह गोविंद भला, रमेश घावट, नानू वाघ, अजय गस्ते या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर कर्जत पोलीस ठाण्यातही ८६ लाख ५ हजार ०६७ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी विजय गांगुर्डे आणि अविनाश राठोड यां माजी अधिकाऱ्यांसह किसन वारघडे आणि प्रकाश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.