केंद्र सरकारची २ लाख कोटींच्या सैन्य सामग्री खरेदीस मंजुरी
01-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलासाठी दि. ३० नोव्हेंबर, गुरुवारी संरक्षण अधिग्रहण परिषदेने ९७ अतिरिक्त तेजस विमाने आणि १५६ प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ही दोन्ही विमाने स्वदेशी बनावटीचे आहेत. हा करार सुमारे १.३ लाख कोटी रुपयांचा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय हवाई दल अधिक शक्तिशाली होणार आहे.
यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय सैन्य अधिक मजबूत होईल. भारतीय हवाई दलासाठी तेजस मार्क १-ए लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत आणि हवाई दल तसेच लष्करासाठी हेलिकॉप्टर खरेदी केले जात आहेत. याबरोबरच संरक्षण खरेदी परिषदेने आणखी काही सौद्यांना मंजुरी दिली आहे. त्याची एकूण किंमत २ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या सौद्यांना मंजुरी मिळाल्याने, भारताच्या इतिहासातील स्वदेशी उत्पादकांना दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
संरक्षण मंत्रालयाने फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस एमके-१ए विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी करार केला होता. हा सौदा ४८ हजार कोटी रुपयांना झाला होता. आता या अतिरिक्त ताफ्यामुळे भारतीय हवाई दलाकडून स्वदेशी विकसित केलेल्या तेजस विमानांची संख्या १८० वर पोहोचेल.
भारतीय हवाई दलाकडे असलेले मिग आणि मिराज लढाऊ विमानाचा सेवा कालावधी संपलेला आहे. या दोन्ही विमानांची जागा भरुन काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाला प्राधान्य दिले आहे. भारतीय हवाई दलाकडे असलेले मिराज हे विमान फ्रेंच बनावटीचे आहे. तर मिग हे विमान रशियन बनावटीचे आहे.