रशियन महिलांचे म्हणणे...

    01-Dec-2023   
Total Views |
Russian Women Protest Long Deployments for Soldiers in Ukraine

नुकतेच एका चर्चच्या सोहळ्यात पुतीन म्हणाले की, “रशियन महिलांनी किमान आठ मुलांना तरी जन्माला घालावे. कारण, रशियाची लोकसंख्या घटते आहे.” गेल्या वर्षीही त्यांनी ‘ग्लोरी टू मदर हिरोईन’ संकल्पना सांगितली होती. यामध्ये दहा मुलांना जन्म दिलेल्या मातेला हा सन्मान दिला जाईल. तिला एक अरब रूबल म्हणजे १३ लाख रुपये प्रदान करण्यात येतील. इतकेच नाही तर गर्भपातासंदर्भातलेही कडक नियम रशियात आहेत. आठ ते दहा मुलांना जन्म द्या, असे पुतीन महिलांना सांगत असतानाच,

मॉस्कोमध्ये शेकडो महिला रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून म्हणत आहेत की, ‘आम्हाला युद्ध नको, शांती हवी आहे!’ या महिलांचा पती, भाऊ किंवा मुलगा रशिया-युक्रेन युद्धात सैनिक म्हणून सामील आहेत. महिलांनी पुतीन यांच्याकडे मागणी केली आहे की, रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्षे, नऊ महिने झाले. एक वर्षे होऊन गेले, आता सैनिकांना परत मायदेशी बोलवा. युद्ध नको, शांती हवी! युद्ध दोन देशांत सुरू आहे. मात्र, त्याचे खर्‍या अर्थाने पडसाद उमटत आहेत, ते सैनिकांच्या कुटुंबावर. युद्धात लाखोंनी सैनिक जीवानिशी जातात. मात्र, त्या सैनिकाची पत्नी विधवा होते, त्या सैनिकाच्या मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपते... रशियातील महिलांचे हेच म्हणणे.

रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीची चिन्ह दिसत नाहीत. या युद्धाचा शेवट काय होणार, याचीही खात्री नाही. सुरुवातीला वाटायचे की, बलाढ्य रशिया काही दिवसांतच युक्रेनला नमवेल. पण, युद्धाला आता दोन वर्षं होतील. युद्धात सैनिकांची दुसरी फळी तयार करून, ती पाठवून आधीच्या सैनिकांना युद्धविश्रांतीही दिली जात नाही. या सगळ्यामुळे रशियन महिला चिंतेत आहेत. त्यातच या दोन वर्षांत रशियन सैनिकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय असेल? यासंदर्भात जगभरातल्या विश्वसनीय संघटनांकडून रशियन सैन्याबाबत फारच नकारात्मक बातम्या प्रसारित होत आहेत. रशियन सैनिकांच्या मृतदेहाचे मांजरी, कुत्रे, डुकरं लचके तोडत आहेत, असा व्हिडिओ समाजमाध्यमांवर काही महिन्यांपूर्वी प्रसारित झाला. स्वतःचा देश सोडून सैनिक युक्रेनमध्ये लढायला गेले. मात्र, त्याचा मृतदेह बेवारसपणे युक्रेनच्या रस्त्यावर पडला आणि त्याच्या मृतदेहाची अशी विटंबना झाली.

काही महिन्यांपूर्वी एक वृत्त पुराव्यासकट प्रसारित झाले की, युद्धाला कंटाळून सात रशियन सैनिक पळून जात होते. हे त्यांच्या वरिष्ठांना कळताच त्यांना पकडले गेले. गोळ्या घालून त्या पळणार्‍या सैनिकांना ठार मारण्यात आले. ’संयुक्त राष्ट्रसंघा’च्या विशेष प्रतिनिधी प्रमिला पैटन यांनी तर म्हटले आहे की, ”सैनिकांमध्ये क्रूरता आणि अत्याचाराची विकृतता वाढावी म्हणून रशिया त्यांच्या सैन्यांना अमली पदार्थ आणि वायग्रा देत आहे. त्यामुळेच रशियन सैनिक युक्रेनमध्ये अत्याचाराची परिसीमा गाठत आहेत.” या सगळ्यांचा सैनिकांच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल, याची कल्पना न केलेली बरी. शत्रू राष्ट्र युक्रेनमध्ये रशियन सैनिक म्हणून गेलेला आपल्या घरचा पुरूष कसा जगत असेल, याची काळजी रशियन महिलांना वाटणे साहजिकच.

असो. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची लोकप्रियता घसरली, असेच चित्र आहे. मात्र, पुतीन यांना तर २०३० सालापर्यंत राष्ट्रपतीपदावर राहायचे आहे. त्यामुळे जनतेचे समर्थन मिळवण्यासाठी ते जनतेच्या भावनिक अस्मिता, परंपरा यांबद्दल बोलताना दिसतात. चर्चसंस्थेचे समर्थन मिळवण्यासाठी चर्चसंस्थेला अभिप्रेत असलेल्या महिला जीवनाचे समर्थन करताना दिसतात. महिलांनी आठ ते दहा मुलांना जन्म द्यायला हवे, असे आवाहन ते करतात. पण, महिलांना नक्की काय वाटते? तर गेल्या काही दिवसांपूर्वी ३३ महिला रशियाहून अर्जेंटिनाला गेल्या.

त्या गरोदर होत्या. त्या तिथे का गेल्या, तर अर्जेंटिना देशाच्या कायद्यानुसार, त्यांच्या देशात कोणत्याही देशाच्या मातेने बालकाला जन्म दिला, तर त्या बालकाला अर्जेंटिनाचे नागरिकत्व मिळते. त्यानुसार पालकांनाही नागरिकत्व मिळते. रशियाच्या युद्धग्रस्त मानसिकतेपासून दूर जावे आणि विनासायास अर्जेंटिनाचे नागरिकत्व मिळावे यासाठी या महिलांचा हा सगळा खटाटोप. गेल्या तीन महिन्यांत जवळ-जवळ ५ हजार, १८९ रशियन महिला अर्जेंटिनामध्ये गेल्या आहेत. रशिया-युके्रन युद्धाचे असेही चिन्हांकित पडसाद!
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.