ठाणे : आंदोलने करायला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी कधी सांगितले नाही. स्वतःच्या हिमतीवर १९८० पासुन आंदोलने करीत असुन तेव्हा मी कुठल्याही राजकिय पक्षात नव्हतो. अशी आत्मप्रौढी आ. जितेंद्र आव्हाड यांनी मिरवली आहे. राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीवर अजितदादा पवार यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड ठाण्यात बरळले.
खरी राष्ट्रवादी कुणाची ? यावरून निवडणुक आयोगात घमासान सुरु असुन अजितदादा गटाकडून शरद पवारांवर दररोज शरसंधान केले जात आहे. यावर ठाण्यात माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी, पवार खानदानाचा उल्लेख करीत अजितदादावर टिकास्त्र सोडले. तर आंदोलनावरून छेडले असता चरफडलेल्या आव्हाडांनी, आंदोलने करतो ती मी स्वतःच्या हिंमतीवर करतो.
कुणाला विचारून करीत नाही. मी कधी जयंत पाटील अथवा शरद पवारांना विचारले नाही. १९८० पासुन आदोलने करीत आहे. ४३ वर्षापुर्वी पहिले आदोलन केले तेव्हा मी कुठल्याही राजकिय पार्टीत नव्हतो. शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून यांना सत्तेत यायचं होते. असेही आव्हाड म्हणाले. तर धनंजय मुंडे यांच्यावर टिका करताना चुलत बहिणी सोबतच्या वादाचे उल्लेख करीत आव्हाडांनी आरोपांची राळ उडवली.