नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्ये पोलिसांचा गणवेश घातलेल्या दरोडेखोरांनी एका भारतीय शीख कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत लुटले आहे. पोलीस प्रवक्ता एहतशाम हैदर यांनी सांगितले की, गुरु नानक यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतातून येथे आलेले कंवलजीत सिंग आणि त्यांचे कुटुंबीय गुरुद्वारा नानकाना साहिब येथून परतल्यानंतर लाहोरच्या गुलबर्ग भागातील लिबर्टी मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले होते.
ते कुटुंब एका दुकानातून बाहेर आले तेव्हा पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांना अडवले आणि बंदुकीच्या जोरावर रोख रक्कम आणि दागिने लुटले. दरोडेखोरांनी दागिन्यांसह 250,000 भारतीय रुपये आणि 150,000 पाकिस्तानी रुपये लुटले. घटनेनंतर लोक तेथे जमा झाले आणि नंतर शीख कुटुंबासह स्थानिक पोलीस ठाणे गाठले.
मुख्यमंत्र्यांकडुन प्रकरणाची दखल...
गुन्हेगारांना तात्काळ पकडण्याचे आदेश मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांनी दिले आहेत. पोलीस उपमहानिरीक्षकांनी भारतीय शीख कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिले की, दरोडेखोरांना अटक केली जाईल आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई केली जाईल. शीख कुटुंबाला लुटण्याची घटना म्हणजे सुरक्षेचे गंभीर उल्लंघन असल्याचे जाहीर करून आरोपींना ४८ तासांच्या आत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.